
जळगावमध्ये झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पहिला अपघात हा चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर झाला. हिरापूर गावाजवळ भरधाव आयशर वाहनाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. ही भीषण अपघातात हिरापूर गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश समावेश आहे.
चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर झालेल्या या अपघातात आयशर वाहनाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही हिरापूर या गावातील रहिवासी आहेत. एकाच गावातील तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी जळगाव–चांदवड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या गावाजवळील रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी केली. यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यात दुसरा अपघात झाला. कन्नड घाटाजवळ एका कारचे अचानक नियंत्रण सुटल्याने कार उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये अहिल्यानगरमधील शेवगाव येथील भाविकांचा समावेश आहे. अपघातग्रस्त कारमधून 7 जण मध्य प्रदेशातील उज्जैनला जात होते. घाटाच्या डोंगराळ भागात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटली त्यामुळे हा अपघात झाला.
या अपघातात शेवगाव येथील तुकाराम रामभाऊ अंभोरे (27), शेखर रमेश दुर्पते (31) आणि घनशाम रामहरी पिसोटे (30) यांचा समावेश आहे. या अपघातात योगेश तुकाराम सोनवणे (28), अक्षय शिवाजी गिरे (25), ज्ञानेश्वर कांता मोड (24) आणि तुषार रमेश घुगे (26) हे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे शेवगाववर शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे या 7 जणांचं देवाचं दर्शन अधुरच राहिलं आहे.