बनाव रचला, पाठीमागून वार केला अन्…; दाजीनेच केला मेहुण्याचा घात, कारण ऐकून हादराल

जळगावच्या पारोळा तालुक्यात ५३ लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी एका कापूस व्यापाऱ्याने आपल्या सख्ख्या मेहुण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दहा दिवसांत आरोपी दाजीला अटक केली.

बनाव रचला, पाठीमागून वार केला अन्...; दाजीनेच केला मेहुण्याचा घात, कारण ऐकून हादराल
jalgaon murder (
| Updated on: Apr 29, 2025 | 7:33 PM

जळगावातील पारोळा तालुक्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. ५३ लाख रुपयांची विमाची रक्कम हडपण्यासाठी एका कापूस व्यापारी असलेल्या दाजीने सख्ख्या मेहुण्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या दाजीला अटक केली आहे. या खूनाचे नेमकं कारणही समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव पारोळा पोलीस ठाण्यात एका आकस्मिक अपघाताची नोंद करण्यात आली होती. एका दुचाकी चालकाचा अपघातात निधन झाल्याचे नमूद करण्यात आले होते. समाधान शिवाजी पाटील असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते धुळ्यातील फागणे या ठिकाणी राहतात. यानंतर पोलिसांना या घटनेमागे काहीतरी संशय आला आणि त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली.

यानंतर पोलिसांनी समाधानचा अपघात झालेल्या घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना एक दुचाकी आढळली. मात्र ती दुचाकी सुस्थितीत होती. यानंतर पोलिसांनी समाधान पाटील याची आई आणि बहिणीची चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना एक महत्त्वाची माहिती सापडली. समाधान पाटील याला दुचाकी चालवता येत नव्हती. तसेच तो अपंग असल्याचेही समोर आले. यानंतर पोलिसांनी आपले सूत्र फिरवले आणि नेमकं काय घडलं याचा शोध घेत दोघांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

या घटनेत समाधान यांचा खून झाल्याचे समोर आले. हा खून त्याच्या बहिणीचा नवरा म्हणजे दाजी असलेल्या संदीप भालचंद्र पाटील यानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आरोपी संदीप पाटील आणि चंद्रदीप पाटील यांनी समाधानला स्कूटीवर बसवून धुळे-जळगाव रोडवर नेले. यानंतर अंधाराचा फायदा घेत त्यांनी लोखंडी रॉडने समाधानच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.

समाधान पाटील हा अशिक्षित होता. तो कुठेही नोकरी करत नव्हता. पण त्याच्या नावे एलआयसीच्या तीन आणि इतर खासगी कंपन्यांच्या दोन अशा एकूण ५३ लाख रुपयांच्या विमा पॉलिसी काढल्या होत्या. ही रक्कम लाटण्याच्या उद्देशानेच संदीप पाटील यांनी त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले.

दहा दिवसांच्या आत गुन्ह्याचा छडा

पारोळा पोलिसांनी केवळ दहा दिवसांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी संदीप भालचंद्र पाटील (दाजी) आणि चंद्रदीप आधार पाटील या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.