गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसांचा माणूस!; मनोज जरांगे पुन्हा कडाडले

| Updated on: Mar 07, 2024 | 12:18 PM

Manoj Jarange Patil on Gunrtna Sadavarte and Devendra Fadnavis : गुणरत्न सदावर्तेंचं नाव घेत मनोज जरांगेंची पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर टीका; नेमकं काय म्हणाले? मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराटीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना काय म्हटलं? वाचा सविस्तर...

गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसांचा माणूस!; मनोज जरांगे पुन्हा कडाडले
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मिळावं, यासाठी लढा सुरू आहे.
Follow us on

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 अंतरवाली सराटी, जालना | 07 मार्च 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर घणाघाती टीका केली. सदावर्ते यांच्यावर टीका करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं. गुणरत्न सदावर्ते आणि कोर्टाबद्दल मला अधिकृत काही माहिती नाही. परंतु गुणरत्न सदावर्ते हे उपमुऱख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेबांचा माणूस आहे. गुणरत्न सदावर्ते यांना बळ मिळणार ते पुन्हा कोर्टात जाणार आहेत. फडणवीस साहेब पुन्हा जा म्हणणार… हे त्यांचे सुरूच राहणार आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.

मराठा समाज पेटून उठलाय- जरांगे

सरकार सोबतच्या चर्चेची दारं उघडेच आहेत. ते बंद केलेले नाहीत. पण आम्ही चुकले की सोडत नाहीत. तो कोणीही असो… सत्ता आहे म्हणून कितीही दडपशाही करू द्या. गुंड विरोधी करू द्या. आता किती दिवस आहे फक्त पंधरा दिवस… मराठ्यांना टाळून पुढचे स्वप्न बघणे शक्य नाही. केसेसला घ्यायला कोणीही तयार आहे. जसे जसे केसेस वाढत आहेत. तसं तसं मराठे पेटून उठायला लागले आहेत. लोकांच्या लक्षात येत आहे की सत्तेची गुंडगिरी आहे. गृहमंत्र्यांना वाटत असेल की मराठ्यांवर केसेस दाखल करून मी बलाढ्य होणार आहे. तर ते चांगलं स्वप्न बघत आहेत आणि त्यांना हे थोड्याच दिवसात कळेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

एसआयटीची वाट पाहातोय- जरांगे

तुम्ही जी एसआयटी लावली आहे. त्याची आम्ही वाट बघत आहे. सरकार दबाव तंत्राचा वापर करत आहे. मागे लावलेले बोर्ड, मागे केलेले रास्ता रोको केले असताना आता गुन्हे दाखल होत आहेत. माझ्यासाठी ज्या गाड्या असतात त्या गाड्या देण्यासाठी नंबर लागलेले आहेत आणि चौकशी करायची असेल तर एसआयटी फडवणीस साहेबांनी माझ्याकडे पाठवावी. गृहमंत्र्यांनी मराठा समाजासोबत सूड भावनेने वागणे त्यांच्यासाठी चांगले नाही मराठे राजकीय सुपडा साफ करून टाकतील, असं मनोज जरांगे यांनी अंतरवालीत बोलताना म्हटलंय.

उद्यापासून जरांगेंचा दौरा

जरांगे पाटील पुन्हा मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी उद्यापासून दौऱ्यावर जाणार आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात संवाद बैठका घेऊन मराठा समाजाशी संवाद साधणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.