जयदत्त क्षीरसागर भाजपच्या व्यासपीठावर, प्रितम मुंडेंसाठी जाहीर प्रचार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठी प्रचारही सुरु केलाय. या निवडणुकीत त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. शिरुर तालुक्यातील खालापुरीमध्ये झालेल्या सभेला जयदत्त क्षीरसागरांनी हजेरी लावत प्रितम मुंडेंना मतदान करण्याचं आवाहन केलं. याशिवाय बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे […]

जयदत्त क्षीरसागर भाजपच्या व्यासपीठावर, प्रितम मुंडेंसाठी जाहीर प्रचार
Follow us on

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठी प्रचारही सुरु केलाय. या निवडणुकीत त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. शिरुर तालुक्यातील खालापुरीमध्ये झालेल्या सभेला जयदत्त क्षीरसागरांनी हजेरी लावत प्रितम मुंडेंना मतदान करण्याचं आवाहन केलं. याशिवाय बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

ज्यांचं आयुष्य दोन्ही काँग्रेस पक्षात गेलं ते आता विकासाच्या मुद्यावर आमच्यासोबत आले आहेत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी ते मोदी लाटेत येऊन मिसळले. आण्णा आले, आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत पंकजांनी सूचक इशारा दिला. घरं फोडणारे आम्ही नाही, ज्या वेदना गोपीनाथराव मुंडेंना झाल्या त्या दुसर्‍याला होऊ नये त्या मताची मी आहे. मित्रालाही धोका देणारे धनंजय मुंडे धोकेबाजाची ऑलिम्पिक स्पर्धा जिंकल्याशिवाय राहणार नाहीत, असा घणाघात पंकजांनी केला.

जयदत्त क्षीरसागरांनीही या सभेत त्यांची भूमिका मांडली. ”आजच्यासारखं चित्र यापूर्वी निवडणुकीत कधीही दिसलं नाही. राजकारणात मी जात, पात, धर्म कधीच पाहिला नाही. सर्वसामान्य लोकांना आपल्या पोटाचं पडतं. रोजची चूल कशी पेटणार? मुलांचं शिक्षण कसं होणार? याची चिंता असते. तीन वर्षांपासून मी अस्वस्थ होतो, ज्या दिव्याला वादळापासून रोखण्याचा प्रयत्न केला, त्याच दिव्याने चटके दिले. त्यामुळे तो विझवलाच पाहिजे,” असा टोला क्षीरसागरांनी लगावला.

”मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही डॉ. प्रितम मुंडे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात यापूर्वी कधीही जातीवाद झाला नाही. रखमाजी गायकवाड, काँ. गंगाधर बुरांडे, केशरकाकु क्षीरसागर, बबनराव ढाकणे यांच्या सारख्या लोकांना जिल्ह्याने निवडून दिले. मग तेव्हा कधी जातीवाद झाला का? मतदान हे विकासाला मिळत असतं, जातीपातीच्या नावाने मतदान मागणे हा खर्‍या अर्थाने आचारसंहितेचा भंग आहे. 50 वर्ष देशात आणि राज्यात सत्ता भोगणार्‍या लोकांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने हा प्रश्‍न मार्गी लावून इतिहास घडवला. मोदी सरकारने 10% आरक्षण सवर्ण लोकांना देऊन प्रगतीच्या वाटेवर आणलं. या मतदारसंघात रक्ताच्या नात्यापेक्षा आम्ही विकासाच्या नात्याने लोकांची मनं जोडली आहेत. मात्र काही मंडळी निवडणुका आल्या की सुपार्‍या घेऊन तुतार्‍या वाजवतात. अशा लोकांना बुक्का लावून त्यांची जागा दाखवा आणि उद्याच्या निवडणुकीत प्रितम मुंडेंना प्रचंड मताने निवडून द्या,” असं आवाहन क्षीरसागरांनी केलं.