जल्लोष केला, औक्षणाची तयारी झाली, तेवढ्यात भंडारा उधळला अन्…नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेक जण होरपळले

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून जेजुरीत विजयोत्सवावेळी भंडाऱ्याचा भीषण भडाका उडाला. यात नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

जल्लोष केला, औक्षणाची तयारी झाली, तेवढ्यात भंडारा उधळला अन्...नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेक जण होरपळले
Jejuri fire
| Updated on: Dec 22, 2025 | 1:07 PM

राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाले. या निकालानंतर सर्वत्र विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, जेजुरीमध्ये मात्र या उत्साहाला भीषण आगीचे गालबोट लागले. जेजुरी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सवासाठी जमलेल्या गर्दीत भंडाऱ्याचा भडाका उडाल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीत दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहे. या चेंगराचेंगरीत एका १० वर्षीय मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेमुळे जेजुरीतील भेसळयुक्त भंडारा आणि अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?

जेजुरी नगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित उमेदवार आणि त्यांचे समर्थक जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीवर, नंदी चौक परिसरात एकत्र जमले होते. जल्लोष सुरू असताना महिला औक्षण करत होत्या. त्याच वेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. मात्र, भंडाऱ्यात असलेल्या ज्वलनशील भेसळीमुळे अचानक आगीचा भडका उडाला. या भडक्यात समोर असलेले नागरिक, महिला आणि मुले होरपळली गेली. आग लागताच एकच धावपळ उडाली, मात्र रस्त्यावरील अतिक्रमणामुळे लोकांना पळायला जागा मिळाली नाही. त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली.

गडावर भेसळयुक्त भंडारा आणू नये

स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त भंडारा विकला जात आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जेजुरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करणे हे जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकेच्या भेसळ विभागाचे काम आहे. गडावर भेसळयुक्त भंडारा आणू नये, असे फलक आम्ही लावणार आहोत,” अशी माहिती घोणे यांनी दिली.

तर ही दुर्घटना टळली असती

तसेच नंदी चौक परिसरात असलेल्या अतिक्रमणामुळे भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागते. कालच्या घटनेवेळी आगीपासून वाचण्यासाठी लोक धावत असताना रस्त्यावरील विक्रेत्यांच्या स्टॉल्समुळे अडथळा निर्माण झाला. नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने वेळीच अतिक्रमण हटवले असते आणि भेसळयुक्त भंडाऱ्यावर बंदी घातली असती, तर ही दुर्घटना टळली असती, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.