शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा, सिब्बल यांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी; त्या युक्तिवादाने खळबळ!
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा, सिब्बल यांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी; त्या युक्तिवादाने खळबळ!

Shivsna Supreme Court Hearing : शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाची मालकी यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. पाच दिवस ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आजचा सिब्बल यांचा हा अंतिम युक्तिवाद आहे. या युक्तिवादात सिब्बल यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिलेला असेल तर सर्वोच्च न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकते, असे मत सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान दिले. सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यात फरक काय? हेदेखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आपल्या याच अंतिम युक्तिवादात सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालायाला सर्वोत मोठी आणि महत्त्वाची विनंती केली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून टाकावे, असे सब्बल म्हणाले आहेत.
शिंदे मुख्यमंत्री झाले, पण कोणत्या पक्षातून?
कपिल सिब्बल यांच्याकडून आजच्या सुनावणीत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. सर्वप्रथम त्यांनी विधीमंडळ पक्षात आणि राजकीय पक्षात काय फरक असतो, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पुढे युक्तिवाद मांडताना शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा होऊच शकत नाही. तो पक्ष उद्धव ठाकरे यांचा आहे, असाही दावा केला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले परंतु ते कोणत्या पक्षातून झाले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमदारांनी बंडखोरी केली. सुनील प्रभू यांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदे यांचे आमदार गैरहजर होते. देवेंद्र फडणवीस यांनीच राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितले. त्यानंतर विधीमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून निवडलं. निवडीचं पत्र राज्यपालांना देण्यात आलं, असा सगळा घटनाक्रमही सिब्बल यांनी न्यायालयापुढे मांडला.
धनुष्यबाण चिन्ह गोठवा, सिब्बल यांची मागणी
दरम्यान, युक्तिवाद अंतिम टप्प्यात असताना कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे सर्वात मोठी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून टाकावे, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. आता न्यायालय सिब्बल यांच्या मागणीवर काय विचार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.