प्रणित मोरेच्या शोमधील ती डॉक्टर तरूणी मार्डची सदस्य नाही, केईएमकडून निवेदन जारी

Pranit More : प्रणित मोरेसह त्याच्या शोमधील प्रेक्षक हिमांशू जांगरा व डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता केईएम मार्डने डॉ. सेजल पवारबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

प्रणित मोरेच्या शोमधील ती डॉक्टर तरूणी मार्डची सदस्य नाही, केईएमकडून निवेदन जारी
DR Sejal Pawar and Kem Mard
Image Credit source: Google
| Updated on: Jun 11, 2026 | 9:32 PM

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेसह त्याच्या शोमधील प्रेक्षक हिमांशू जांगरा व डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्हिडिओमध्ये एका महिला डॉक्टरने एका पेशंटच्या मृत्यूनंतर त्याचा डेड बॉडीबाबत वादग्रस्त विधान केले होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील व महिलांबाबत अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत BNS व IT अॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तिघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. अशातच आता डॉ. सेजल पवार ही मार्डची सदस्य नसल्याची माहिती केईएम प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सेजल पवार केईएम मार्डची सदस्य नाही

केईएम मार्डने एक निवेदन जारी केले असून यात म्हटले की, केईएम मार्ड हे निवासी डॉक्टर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणारे संघटन आहे. सध्याच्या वादाशी संबंधित व्यक्ती ही एमबीबीएसची पदवीपूर्व विद्यार्थिनी असून ती केईएम मार्डची सदस्य नाही. तरीही, केईएम वैद्यकीय परिवाराचा एक भाग म्हणून या घटनेमुळे निर्माण झालेल्या चिंतेबाबत भूमिका मांडणे आम्हाला आवश्यक वाटते.

केईएम मार्ड व्यावसायिकता, नैतिक आचारसंहिता आणि देहदान करणाऱ्या दात्यांप्रती सर्वोच्च आदर या मूल्यांचे कटाक्षाने पालन करते. वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांचे निःस्वार्थ योगदान अमूल्य आहे. संबंधित विद्यार्थिनीने केलेली विधाने अयोग्य होती, ती वैद्यकीय व्यावसायिकांकडून अपेक्षित असलेल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, याची आम्हाला जाणीव आहे.

आम्ही तिच्या विधानाचे समर्थन करत नाही

एखाद्याने केलेल्या वक्तव्याबद्दल जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असते. संबंधित विद्यार्थिनीने सार्वजनिकपणे खेद व्यक्त करत माफीही मागितली आहे. केईएम मार्ड तिच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. मात्र, त्यानंतर सुरू झालेली वैयक्तिक बदनामी, ऑनलाइन शिवीगाळ आणि लक्ष्य करून केलेला छळ हा ना विधायक आहे, ना परिस्थितीशी सुसंगत आहे, असे आम्हाला वाटते.

सार्वजनिक चर्चेमध्ये संयम, जबाबदारी आणि वस्तुनिष्ठता असावी. चर्चा केवळ या घटनेपुरती मर्यादित राहावी आणि विद्यार्थिनीच्या आरक्षण कोट्यातून झालेल्या प्रवेशासारख्या असंबंधित मुद्द्यांपर्यंत ती नेली जाऊ नये. वैद्यकीय क्षेत्रातील सदस्य म्हणून आम्ही जबाबदारी, आत्मपरीक्षण आणि शिकण्याच्या प्रक्रियेचे समर्थन करतो. त्याचवेळी, या विषयावरील चर्चा सन्मानपूर्वक, संतुलित आणि मानवी मूल्यांना अनुसरून व्हावी, अशी आमची भूमिका आहे.

 

Follow Us