पैठणी अन् पैशांवर शिक्षकांनी मतदान केलं, पराभूत श्रीकांत देशपांडेंच्या आरोपांनी खळबळ, अमरावतीत काय घडलं?
अमरावती शिक्षकचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये शिंंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली असून किरण सरनाईक यांचा मोठा विजय झाला आहे. दरम्यान पराभूत उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव झाल्यानंतर ते भावूक झालेले पाहायला मिळाले.

अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे बंडखोर उमेदवार माजी आमदार श्रीकांत देशपांडे ७ हजार १७ मतं घेत पराभूत झाले आहेत. त्यामुळे देशपांडे यांचा मोठा पराभव झाला आहे. हा पराभव झाल्यावर देशपांडे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी या परभवानंतर दिलेली प्रतिक्रिया चर्चेमध्ये आली आहे. त्यांनी सांगितलं की, शिक्षकांची कीव करावीशी वाटते, पैठणी अन् पैशांवर शिक्षकांनी मतदान केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
पराभूत उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी संताप व्यक्त करत पुढे म्हटलं की, जशी लायकी तसा त्यांना प्रतिनिधी मिळतो. शिक्षक आणि निवडून आलेल्या उमेदवाराला शुभेच्छा देतो, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. 7 हजार लोक प्रामाणिक राहिले बाकी लोकांचं काय, बाकी सगळ्यांनी त्यांची मतं विकली याचं वाईट वाटतं अशी खंतही यावेळी देशपांडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, अमरावती शिक्षकच्या जागेवर तीन भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी केली होती. त्याशिवाय महाविकास आघाडीच्या उमेदवार अदिती पोहरे यांचंही आव्हान होतं. या सगळ्या आव्हानांना मात देत शिंदे सेनेने या जागेवर मोठा विजय साकारला आहे. याठिकाणी विजयी गुलाल उधळला आहे तो शिंदेंच्या सेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांनी. या विजयानंतर त्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं की, मला असे काही शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक भेटले होते. ज्यांनी मला सांगितलं की गेली कित्येक वर्ष कोणताही आमदार आमच्याकडे भटकलेला नाही. पण तुम्ही आम्हाला मदत केली. त्यामुळे आम्ही केलेली मदत आणि शिक्षकांनी दाखवलेला विश्वास याच्या बळावर आम्ही हा विजय खेचून आणला आहे.
दरम्यान, श्रीकांत देशपांडे यांच्या पराभवामुळे त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. याठिकाणी अदिती पोहरे यांना अंतर्गत नाराजीचा फटका बसल्याचीही चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या नाराजीमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असण्याची शक्यता मतदारांंकडून व्यक्त करण्यात येत आहे.
