एकत्र दारु प्यायले, सोबत जेवले; पण शेवट मात्र थरकाप उडवणारा… खडवलीत त्या रात्री नक्की काय घडलं?
खडवली येथे ७०० रुपयांच्या शुल्लक वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकत्र जेवण आणि मद्यपान केल्यानंतर त्याच रात्री हा रक्तरंजित प्रकार घडला. वाचा या प्रकरणाचा सविस्तर तपशील

कल्याणजवळील खडवली नदीच्या काठावर तीन दिवसांपूर्वी रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. या सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. केवळ ७०० रुपयांच्या चोरीच्या संशयावरून एका सराईत गुन्हेगाराने आपल्याच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. टिटवाळा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने याप्रकरणाचा तपास करत आरोपीला मुंबईतून अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मृत राजेश आणि आरोपी योगेश कदम हे दोघेही केटरिंग व्यवसायात एकत्र मजूर म्हणून काम करत होते. कामाच्या निमित्ताने त्यांच्यात घट्ट मैत्री होती. घटनेच्या दिवशी हे दोघे मौजमजा करण्यासाठी आणि नदीत आंघोळीचा आनंद घेण्यासाठी खडवली परिसरात आले होते. दिवसभर आनंदात घालवल्यानंतर दोघांनी तिथेच जेवणाची आणि दारुची पार्टी केली.
पार्टी सुरू असताना योगेशला संशय आला की राजेशने त्याच्या खिशातील ७०० रुपये चोरले आहेत. याच पैशांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर संतापलेल्या योगेशने जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून राजेशच्या डोक्यात वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी योगेश घटनास्थळावरून पसार झाला होता.
आरोपीचा शोध कसा लागला?
यानंतर पोलिसांना टिटवाळ्यातील खडवली परिसरात असलेल्या नदीकाठी एक मृतदेह सापडला आहे, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटवणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान होते. यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश धागे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी श्वान पथकातील एका श्वानच्या मदतीने घटनास्थळापासून खडवली रेल्वे स्थानकापर्यंतचा माग काढला. ज्यामुळे आरोपी रेल्वेने गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी खडवली ते मुंबई दरम्यानचे ३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक तपासादरम्यान आरोपी एका व्यक्तीशी बोलताना दिसला, ज्यावरून दोघांची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी योगेश कदम याला मुंबईतून ताब्यात घेतले.
यानंतर तपासात असे उघड झाले की योगेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते.