गोकुळच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांची ताकद पणाला, किती झालं मतदान, कोण मारणार बाजी?
गोकुळवर कोणाची सत्ता येणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आशिया खंडातील सर्वात अग्रगण्य अशा कोल्हापूरमधील गोकुळ दुध महासंघासाठी आज मतदान पार पडले आहे. यावेळी एकूण मतदानाची आकडेवारीही समोर आली आहे. या निवडणुकीतल्या घडमोडींवर एक नजर..

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गोकुळच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी 50 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यातील 5418 पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावत असून, सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडले आहे.
महायुती विरुद्ध सतेज पाटील यांची आघाडी
गोकुळची निवडणूक गेल्या काही महिन्यांपासून राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आहे. पात्र-अपात्र संस्थांचा वाद, प्रशासक नेमणुकीचा मुद्दा आणि मतदानाआधी ठरावधारकांना सौंदत्ती येथे नेऊन यल्लमा देवीच्या भंडाऱ्यावर घेतलेल्या शपथा, यामुळे निवडणुकीतील वातावरण चांगलंच तापलं होतं.
या निवडणुकीत महायुतीच्या (भाजप) राजर्षी शाहू विकास आघाडीसमोर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचं आव्हान आहे. सतेज पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना सोबत घेत प्रचार केला. दुसरीकडे, महायुतीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मतदारांना बंगळूरु आणि बेळगाव येथे सहलीवर पाठवण्यात आलं होतं. हे मतदार शनिवारी रात्री कोल्हापुरात परतले आहेत.
12 तालुक्यांत 35 मतदान केंद्रे
दरम्यान, यंदा प्रथमच प्रत्येक तालुक्यात मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील 12 तालुक्यांत 35 केंद्रांवर मतदान सुरू झाले. करवीर तालुक्यात सर्वाधिक 865 मतदार असून, येथे 5 मतदान केंद्रे आहेत. पाच वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी स्वतंत्र रंगांच्या मतपत्रिका वापरण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मतदानानंतर सोमवारी, 19 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजल्यापासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये 32 टेबलांवर मतमोजणी होईल. त्यामुळे गोकुळवर कोणाची सत्ता येणार, याचा फैसला उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
गोकुळ दूध संघासाठी दुपारी एक वाजेपर्यंत 44 टक्के मतदान झाले होते. आता सायंकाळी चार वाजेपर्यंत 99.74 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. राधानगरी कागल करवीर तालुक्यातील केंद्रावरील मतदान शंभर टक्के पूर्ण झले आहे. शेवटच्या तासात जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर दोन्ही आघाड्यांचां भर आहे.
