
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. दोन चिमुकलींवर बिबट्याने हल्ला केला असून त्यांना ठार केल्याची घटना ताजी असतानाच कोपरगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा धोका अजूनही कायम आहे. टाकळी फाटा परिसरात दोन जीव घेतलेल्या बिबट्याला शार्प शूटर पथकाने ठार केले. मात्र, समस्या संपलेली नाही. काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याने पती–पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मंगळवार रात्री सायंकाळच्या सुमारास माहेगाव देशमुख परिसरात बिबट्याने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्यावर झडप घातली.
कोळपेवाडी येथील भाऊसाहेब वाघडकर हे आपल्या पत्नीसह कोपरगावकडे येत होते. मारुती मंदिराजवळ दाट झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्याच्या झडपीनंतर पती पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. हल्ल्यात दोघांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलग हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तालुक्यातील सर्व बिबटे नरभक्षक झाल्याचा प्रश्न आता आमच्या मनात निर्माण होतोय, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
बिबट्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण बघायला मिळतंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील हसनापूर शिवारात मादी बिबट्या जेरबंद झाला. वनविभागाच्या पथकाने लावलेल्या पिंजऱ्यात सकाळी बिबट्या अडकला. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींनी दहशत बघायला मिळाली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आली. बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता आहे.
बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी बिबट्या मादीची नसबंदी, नरभक्षक बिबट्याला ठार करणे आणि मानवी वस्तीत वास्तव्य करणा-या बिबट्याला जेरबंद करणे अशा तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना राज्य सरकारने वनविभागाला देण्यात आल्या असुन यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यात दोन रेस्क्यु सेंटर उभारणी, माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबट मादीची नसबंदी करण्याबाबत सुचना देण्यात आल्याची माहिती जुन्नर वनपरिक्षेत्र सहाय्यक वनरक्षक स्मिता राजहंस यांनी दिली.