…तर माजी आमदारासह गेला असता सगळ्यांचा जीव, मालेगाव महापालिकेत थरार; वाचा बसली, काय घडलं?

Malegaon : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगर पालिकेत महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. यानंतर मालेगाव महापालिकेत एक भीषण अपघात झाला. यात अनेकांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

...तर माजी आमदारासह गेला असता सगळ्यांचा जीव, मालेगाव महापालिकेत थरार; वाचा बसली, काय घडलं?
Malegaon Accident
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 07, 2026 | 6:37 PM

राज्यातील महानगर पालिकांची निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगर पालिकेतही महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. महापौरपदी अपेक्षेप्रमाणे इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख खालिद तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांची यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे महापालिकेत सुरवातीपासून अलिप्त राहणाऱ्या भाजप व एमआयएम तटस्थ राहणे पसंत केले. ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर मालेगाव महापालिकेत एक भीषण अपघात झाला. यात अनेकांचा जीव थोडक्यात वाचला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

माजी आमदाराचा जीव वाचला

मालेगाव शहरात मनपा महापौर-उपमहापौर निवड प्रक्रिया चौथ्या मजल्यावर पार पडल्यानंतर इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख तसेच समाजवादी पार्टीचे मुश्तकिन डिग्नीट यांच्यासह पदाधिकारी व काही पत्रकार लिफ्टने खाली येण्यासाठी निघाले. मात्र ऐनवेळी लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त संख्या झाली अन् वायररोप तुटल्याने लिफ्ट कोसळून मोठा अपघात झाला. यात माजी आमदारासह सर्वांचा जीव गेला असता, मात्र सर्वजण सुदैवाने बचावले आहेत.

पालिकेच्या गलथान कारभारामुळे अपघात

मनपाच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार घडला. कारण लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन आल्यानंतर लिफ्टने संकेत देणे गरजेचे होते. तिने सायरन दिल्यानंतर किमान काही पदाधिकारी बाहेर निघाले असते. मात्र वेळोवेळी तिची देखभाल न झाल्यामुळेच ही लिफ्ट कोसळली. यापूर्वी दोनवेळा असा प्रकार घडला आहे. यातून मनपाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. याशिवाय लिफ्टची दृघटना झाली असतांना देखील मनपाच्या आवारात एकही रुग्णवाहिका घटनास्थळी उपलब्ध नव्हती. क्षमतेपेक्षा जास्तजण या लिफ्टमध्ये शिरल्यानेच हा प्रसंग घडला असला तरी मनपाने वेळोवेळी या लिफ्टची देखभाल करणे गरजेचे आहे. आता नवे शिलेदार यात काय सुधारणा करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महापौर-उपमहापौरांसमोर घडली दुर्घटना

महापौर-उपमहापौरांसह सर्व नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेत दाखल झाले होते. आज पहिल्याच दिवशी ही दुर्घटना झाली. यातून मनपाच्या निष्काळजीणा आणि कामचुकारपणासह अपुऱ्या उपाययोजनांची समस्या त्यांनी समक्ष अनुभवली असून मनपाच्या आवारात रुग्णवाहिका देखील नव्हती. त्यामुळे आता नव्या चेहऱ्यांना थेट मनपाच्या मुख्य इमारतीच्या दुरुस्तीपासून समस्या सोडविण्याचा श्रीगणेशा करावा लागणार आहे.