भाजपचा मेगाप्लॅन, प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी देण्याची तयारी केली आहे.

भाजपचा मेगाप्लॅन, प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी

नवी दिल्ली : भाजपची बी टीम म्हणून सातत्याने अवहेलना केलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला भाजपकडून मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी देण्याची तयारी केली आहे. राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा खासदाराची नियुक्ती करायची आहे. त्यासाठी भाजपकडून प्रकाश आंबेडकरांचं नाव पुढे करण्याची तयारी आहे.

एकीकडे काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचे प्रयत्न असताना, भाजप मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यासाठी, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्याला चर्चा करण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्या आहेत. भाजपाचे नेते लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रपती लवकरच विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींची राज्यसभेवर नेमणूक करणार आहे. यामध्ये कायदे तज्ज्ञ म्हणून प्रकाश आंबेडकर यांचं नाव भाजपकडून पुढे करण्याच्या तयारी आहे.

काँग्रेसकडून हालचाली

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही जोरदार हालचालींना सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 29 जून रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर 30 जूनला नाशिकमध्ये काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसमध्ये सामील व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला बरोबर न घेतल्याने काँग्रेसला महाराष्ट्रात फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी वंचितने सोबत यावं अन्यथा आमचंही नुकसान होईल आणि तुमचंही असा सल्ला अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दिला. काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना 25 जागा देण्याची तयारी केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर 50 जागांवर ठाम आहेत,अशी माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या 

वंचितने काँग्रेसमध्ये सामील व्हावं, अशोक चव्हाणांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला 

प्रकाश आंबेडकरांची 50 जागांची मागणी, काँग्रेस मात्र 25 जागांसाठी राजी : सूत्र

अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर होणार, महाराष्ट्रात ओबीसी चेहऱ्याला संधी?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *