ATSचं पथक भिवंडीत घुसलं, या गावात मध्यरात्रीपासून मोठं सर्च ऑपरेशन; नेमकं काय घडतंय?

भिवंडी तालुक्यातील बोरिवली गावात एटीएसने मोठे सर्च ऑपरेशन राबवले. ISIS शी संबंधित संशयितांच्या घरी छापे घालून अनेकांना ताब्यात घेतले. साकिब नाचण या कुख्यात दहशतवाद्याशी या गावाचा संबंध असल्याने हे ऑपरेशन महत्त्वाचे आहे.

ATSचं पथक भिवंडीत घुसलं, या गावात मध्यरात्रीपासून मोठं सर्च ऑपरेशन; नेमकं काय घडतंय?
THANE ATS
| Updated on: Jun 02, 2025 | 11:11 AM

भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावात आज सकाळी एटीएसने मोठे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या ऑपरेशनमुळे संपूर्ण गावात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या एटीएसची संपूर्ण टीम सकाळपासून अनेक संशयास्पद व्यक्तींच्या घरी जाऊन छापेमारी करत आहे. यामुळे गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे.

नेमकं काय घडतंय? 

महाराष्ट्रात एटीएसकडून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) शी संबंधित कथित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. यात भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावात आज पहाटेपासून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) एक मोठं सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या कारवाईमुळे संपूर्ण गावात ४५० ते ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसकडून सुरू असलेल्या या छापेमारीदरम्यान ८ ते १० संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या कारवाईत ठाणे ग्रामीण, रायगड आणि ठाणे पोलीस दलातील कर्मचारीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

बोरिवली गाव दहशतवाद्यांचा तळ

बोरिवली गाव हे साकिब नाचण आणि इतर दहशतवाद्यांचा तळ म्हणून ओळखलं जातं. यापूर्वीही या गावातून अनेकदा दहशतवाद संबंधित कारवाईंमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. याच गावातून कुख्यात साकिब नाचण, त्याचा मुलगा आणि इसिसमधील दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या १६ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच पुणे येथील एका प्रकरणात चार जणांना येथूनच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे हे गाव सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.

सध्या ताब्यात घेतलेल्या संशयितांची ओळख आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीबद्दल एटीएसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे दहशतवादी कारवायांना आळा घालण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

साकिब नाचण नक्की कोण?

साकिब नाचण हा प्रतिबंधित स्टूडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) चा पदाधिकारी होता. यापूर्वीच दोन दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरला आहे. २००२-२००३ मध्ये झालेल्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता. २०१७ मध्ये शिक्षा पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे.