13 वर्षांनंतर नागपूरच्या मातीत पुन्हा ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार! 1300 मल्ल, 42 शहरं अन् 4 दिवस रंगणार महासंग्राम, तारीख आली समोर

Maharashtra Kesari Championship 2027: तब्बल १३ वर्षांनंतर नागपुरात महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम रंगणार आहे. यासाठी १३०० मल्ल भिडणार आहेत. याची तारीख समोर आली आहे.

13 वर्षांनंतर नागपूरच्या मातीत पुन्हा महाराष्ट्र केसरीचा थरार! 1300 मल्ल, 42 शहरं अन् 4 दिवस रंगणार महासंग्राम, तारीख आली समोर
Nagpur Gears Up for Maharashtra Kesari
| Updated on: Nov 17, 2026 | 5:06 PM

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कुस्तीची परंपरा आणि मल्लांच्या ताकदीचा थरार पुन्हा एकदा नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद नागपूर शहराला मिळाले आहे. येत्या 20 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत नागपुरात कुस्तीचा हा महासंग्राम रंगणार आहे. राज्यभरातील कुस्तीप्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे.

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. लकडगंज परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर महाराष्ट्र केसरीचा आखाडा सजणार आहे. तब्बल 13 वर्षांनंतर नागपुरात ही स्पर्धा होत असल्याने स्थानिक कुस्तीप्रेमी आणि खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेत राज्यातील 42 शहरे आणि विविध संघ सहभागी होणार आहेत.

Loading...

साधारण 1300 मल्ल आपले कुस्ती कौशल्य पणाला लावून प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणार आहेत. त्यामुळे विविध वजनगटांतील चुरशीच्या लढती पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे मल्ल आपल्या ताकदीच्या जोरावर महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावण्यासाठी मैदानात उतरतील. स्पर्धेच्या आयोजनासाठी मैदानावर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये दोन मॅटचे आखाडे आणि दोन मातीचे आखाडे तयार केले जाणार आहेत.

आधुनिक कुस्तीच्या मॅटवरील डावपेचांसोबतच पारंपरिक मातीतील कुस्तीचाही थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्पर्धेचे नियोजनही करण्यात येणार आहे. महाराष्ट्र केसरी हा राज्यातील कुस्तीपटूंसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा किताब मानला जातो. या स्पर्धेत सहभागी होणे आणि विजेतेपद मिळवणे हे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत कोणता मल्ल आपल्या ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना चितपट करून महाराष्ट्र केसरीचा मान मिळवतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या माहितीनुसार, 13 वर्षांनंतर नागपूरला या स्पर्धेचे यजमानपद मिळणे ही कुस्तीप्रेमींसाठी महत्त्वाची बाब आहे. जानेवारीत होणाऱ्या या महासंग्रामामुळे नागपूरमध्ये कुस्तीचा उत्सव रंगणार आहे., राज्यातील मल्लांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us