विदर्भ, मराठवाडा ते कोकण…; कोणत्या तारखेला कुठे पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज काय?

महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेला पावसाचा अंदाज, मान्सूनचे वेळापत्रक आणि शेतकऱ्यांसाठी कृषी तज्ज्ञांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला सविस्तर वाचा.

विदर्भ, मराठवाडा ते कोकण...; कोणत्या तारखेला कुठे पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज काय?
monsoon
| Updated on: May 05, 2026 | 8:54 AM

सध्या महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढला आहे. या कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून वेळेवर दाखल होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज आहे. त्यानंतर त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू होईल.

केरळमध्ये वेळेत आगमन, देशात काय स्थिती?

सामान्यतः मान्सून १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, यंदाही ही स्थिती कायम पाहायला मिळत आहे. यंदा मान्सूनची प्रगती समाधानकारक आहे. संपूर्ण देशाचा विचार करता, यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस थोडा कमी म्हणजेच ९२ ते ९५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तरी मान्सूनचे वेळेवर आगमन शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पॅसिफिक महासागरातील अल निनो स्थितीचा मान्सूनवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार?

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे ८ ते १० दिवसांत मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करतो. त्यामुळे यंदा १० ते १२ जूनच्या दरम्यान कोकण किनारपट्टी आणि मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे आणि मध्य महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत मान्सून राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचू शकतो. विदर्भ आणि मराठवाड्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे २० जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल. यानंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज आहे.

सध्या मे महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र तरी मान्सूनची मुख्य वाटचाल अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या वेगावर अवलंबून असेल. हवामान विभागाने मान्सून वेळेवर येईल असे म्हटले असले, तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे. जोपर्यंत जमिनीचा ओलावा पुरेसा होत नाही आणि किमान ८० ते १०० मिमी पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणी टाळावी, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us