पत्नीला संपवण्याचे 3 प्रयत्न फसले, पतीने चौथ्या वेळी असा सापळा रचला की… थेट मृतदेहच घरी आला, महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना

एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे. एका पतीने पत्नीला संपवण्यासाठी भयानक कट रचल्याचे समोर आले आहे.

पत्नीला संपवण्याचे 3 प्रयत्न फसले, पतीने चौथ्या वेळी असा सापळा रचला की... थेट मृतदेहच घरी आला, महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना
Man Killed Wife MH
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 09, 2026 | 5:36 PM

राज्यात दररोज अनेक अपघात घडतात आणि या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. मात्र काही अपघात हे घातपात देखील असतात. अशीच एक घटना आता जळगावातून समोर आली आहे, या घटनेचे धागेदोरे हे बुलढाण्यापर्यंत जोडलेले पहायला मिळाले. एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे. किरकोळ अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात 1 लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणलेला कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आता पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील कवठळ गावाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा गाडीने शाळेवर जाणाऱ्या शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र जळगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि त्यानंतर भयानक सत्य समोर आले.

पोलिसांनी घटना स्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास केला असता तपासादरम्यान संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (एमएच 28 बीबी 5753) गाडीकडे वळाली. ही गाडी मनीष सुर्यवंशी, राहणार शेगाव यांची असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. यावेळी मनीषने या थरारक कटाची कबुली दिली आहे.

चौकशीतून कट समोर

मनीषने दिलेल्या कबुली जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य सूत्रधार मृत वृषाली यांचा पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार, राहणार पातुर्डा यांनी मिळून हा कट रचला असल्याचे सांगितले. मृतक वृषाली यांना याआधी अन्नातून विष देऊ मारण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे.

आरोपींना पोलीस कोठडी

आरोपींनी मनीष सुर्यवंशी याला वृषाली यांना गाडीने उडवण्यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे 2 मार्चच्या सकाळी मनीषने वृषाली यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि मागून कट मारून त्यांना खाली पाडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्यात वाहन चालक मनीष सूर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंता गावंडे या तिघांनाही पोलिसांनी आरोपी केले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 61(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर पतीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Follow Us