अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं जुनं पुस्तक सापडलं… अन् राज ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा

नुकताच राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ते जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे केवळ राजकारणी नाहीत, ते कलासक्त राजकारणी आहेत.

अचानक सुख पाहता या नाटकाचं जुनं पुस्तक सापडलं... अन् राज ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा
Raj Thackeray
| Edited By: | Updated on: Feb 23, 2026 | 10:15 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे केवळ राजकारणी नाहीत, ते कलासक्त राजकारणी आहेत. स्वत: व्यंगचित्रकार आहेत. त्यांचा व्यासंग अत्यंत दांडगा आहे. प्रत्येक गोष्टीचं त्यांचं बारीक निरीक्षण असतं. सिनेमासारखंच चित्रपट आणि नाटक हे त्यांचं पॅशन आहे. त्यामुळेच आजही अनेक कलाकार त्यांना भेटून सल्ला घेत असतात. कलाकारांचा गोतावळा त्यांच्या भोवती नेहमी असतो. राज ठाकरे यांना सिनेमाप्रमाणेच नाटकाचंही प्रचंड वेड आहे. त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमधून ‘सुख पाहता’ या नाटकाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. घरातील लायब्ररीत ‘सुख पाहता’चं पुस्तक सापडलं आणि राज ठाकरे व्यक्त झाले. काय दिला राज ठाकरेंनी आठवणींना उजाळा?

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी…

काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर.
तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं !

घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं ‘सुख पाहता’ नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची.
असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो.

पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ.

एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती.

आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं.

मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा…

राज ठाकरे ।

Follow Us