मोठी बातमी! ‘एअरबसचा प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला गेला’, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा

| Updated on: Oct 27, 2022 | 10:37 PM

वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण संबंधित निर्णय हा वर्षभरापूर्वीच झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

मोठी बातमी! एअरबसचा प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला गेला, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रासाठी एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा टाटा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याची चर्चा आहे. खरंतर टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आला होता. या प्रकरणी राजकीय वातावरण तापत असतानाच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नागपुरात येणारा एअरबस प्रकल्प हा वर्षभरापूर्वीच गुजरातला नेण्याचा निर्णय झाल्याची माहिती स्वत: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. एअरबसच्या आरोपांवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय हा वर्षभरापूर्वीच कंपनीने घेतला होता, असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.

“युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप मी समजू शकतो. कारण विरोधक म्हणून हे आरोप आम्हाला देखील अपेक्षित आहेत. पण त्या आरोपांमुळे युवा पिढीत संभ्रम निर्माण करु नये, अशी माझी विनंती आहे. कारण या प्रकल्पाबाबत मी एका मुलाखतीत नक्कीच उल्लेख केला होता की हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु. पण त्यानंतर माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की 21 सप्टेंबर 2021 रोजीच या प्रक्लपाचा एमओयू झालेला होता. म्हणजेच वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे निश्चित झालेलं होतं. याची कागदपत्रेही आपल्याला बघायला मिळतील.आपल्या युवा पिढीचं दुर्देवं असं आहे की, एक वर्षापूर्वी एमओयू झाला, पण तो प्रकल्प आमच्याकडे यावा यासाठी साधं एक पत्रही गेल्या सरकारकडून केंद्र सरकारकडे गेलं नाही, अशी माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

‘वेदांताच्या बाबतही हेच झालं’

खादं जुनं कुठलं प्रकरण, जो प्रकल्प गुजरातमध्ये गेलेला आहे ते आज कुठे जाहीर झाला म्हणून त्यातून एक प्रपोगांडा निर्माण करायचा. युवा पिढीत संभ्रम निर्माण करायचा. आपण काहीच करु शकलो नाही, असं असताना त्याचं पाप दुसऱ्यावर सोडायचं. ही राजकीय प्रवृत्ती चांगली नाही. एक वर्षापूर्वी ज्या प्रकल्पाचा एमओयू झालाय, थोडेफार संकेत असे आहेत की, ज्या प्रकल्पाचा एमओयू झालाय त्याची जागादेखील ठरली आहे. म्हणून मी ज्यावेळी सांगितलं की या प्रकल्पासाठी प्रयत्न करतोय. पण मी ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी असं लक्षात आलं की, याबाबत कुठेही पत्रव्यव्हार झालेला नाही. आरोप-प्रत्यारोप करण्यामध्ये काही अर्थ नाही. वेदांताच्या बाबतही हेच झालं. आठ महिन्यांमध्ये हाय पावर कमिटी कुणी लाऊ शकलं नाही”, असं उदय सामंत म्हणाले.

‘पाच ते सहा महिन्यात एक खूप मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार’

“आरोप-प्रत्यारोपापेक्षा युवा पिढीला अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी एक उद्योगमंत्री म्हणून माझी आहे. म्हणून पुढच्या पाच ते सहा महिन्यात एक खूप मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे, याची मला खात्री आहे”, असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं.