
सुनील जाधव, ठाणे, दि. 11 जानेवारी 2024 | शिवसेनेसंदर्भात १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. या निकालात शिवसेनेची २०१८ मधील घटना अमान्य केली. उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड अमान्य करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु झाली आहे. पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात या निकालास आव्हान देण्यात येणार आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या सासुरवाडीत लागलेल्या बॅनरवरुन चर्चा रंगली आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख पक्षप्रमुख ऐवजी कुटुंबप्रमुख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून हे बॅनर लावण्यात आले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे यांचीच, असा निकाल दिला आहे. या निकालानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली सासुरवाडी डोंबिवली येथे येणार आहेत. उद्धव ठाकरे हे संपर्क दौऱ्यानिमित कल्याण लोकसभा मतदान क्षेत्रात शनिवारी येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शिवसेना ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर उद्धव यांचा कुटुंब प्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे निकाल मान्य केल्याची चर्चा रंगली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. शिवाय शिवसेनेचा बालेकिल्ला देखील आहे. या लोकसभा मतदार संघासाठी एकीकडे भाजप प्रयत्न करत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाकडून हा लोकसभा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरणार आहे.
डोंबिवलीमधील शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुक्ता आहे. ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे पहावे लागणार आहे. त्याच बरोबर ठाकरे यांची तोफ मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात धडाडणार असून ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.