
असंख्य मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला. कल्याण आणि अंबरनाथ-बदलापूर येथे रेल्वेच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी मध्य रेल्वेने शनिवार ९ ऑगस्ट आणि रविवारी १० ऑगस्ट च्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला. या कामामुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला.
मध्य रेल्वेने रविवारी (१० ऑगस्ट) पहाटे घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पहाटे ५ ते ६ या वेळेत लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मेगाब्लॉकच्या कालावधीत एकही लोकल ट्रेन उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांना अनेक तास फलाटांवर थांबून राहावे लागले. अखेर सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी रेल्वे प्रशासनाकडून एक विशेष लोकल सोडण्यात आली. पण त्यातही प्रचंड गर्दी झाल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला.
काही प्रवाशांनी कामावर वेळेत पोहोचण्यासाठी लोकलची वाट न पाहता मेल-एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे त्यांचा वेळ वाया गेले. पहाटेच्या वेळेतच ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक प्रवाशांनी यामुळे संताप व्यक्त केला आहे.
मध्य रेल्वेने कल्याण आणि अंबरनाथ-बदलापूर दरम्यान महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी दोन दिवस घेतलेल्या या ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाने काही गाड्या वळवल्या आहेत. तर काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. हा विशेष ब्लॉक ९ आणि १० ऑगस्टच्या मध्यरात्री १२.१० वाजल्यापासून ते रविवार सकाळी ०६.५५ वाजेपर्यंत घेण्यात आला होता. या काळात कल्याण स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ दरम्यान पादचारी पुलासाठी स्टील गर्डर बसवण्याचे काम करण्यात आले. त्याचबरोबर, अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान जुन्या एमआयडीसी पाईपलाईन पुलाच्या जागी प्रस्तावित उड्डाणपुलासाठी गर्डर उतरवण्याचे कामही करण्यात आले.
डाउन मार्गावरील गाड्या: मुंबईहून सुटणाऱ्या २२१५७ चेन्नई एक्स्प्रेस, ११०५७ अमृतसर एक्स्प्रेस, २२१७७ महानगरी एक्स्प्रेस यांसारख्या १० गाड्या दिवा आणि कल्याणदरम्यान ५ व्या मार्गिकेवरून वळवण्यात येतील.
अप मार्गावरील गाड्या: ११०२० कोणार्क एक्स्प्रेस, १२७०२ हुसेनसागर एक्स्प्रेस यांसारख्या ५ गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येतील. कल्याण येथे उतरणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येईल. अप मार्गावरील काही गाड्यांना उशीर होईल. २२१७८ सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस आणि ११०२२ तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस या गाड्या काही काळासाठी थांबवून ठेवल्या जातील.
ब्लॉक काळात अंबरनाथ आणि कर्जतदरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. ९ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा एकूण २१ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परळ-अंबरनाथ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण, डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बदलापूर-ठाणे या मार्गावरील काही सेवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या. तर १० ऑगस्ट (रविवार) रोजी: पहाटेच्या वेळी एकूण २७ लोकल फेऱ्या रद्द होतील. तसेच अनेक सेवा शॉर्ट टर्मिनेट किंवा शॉर्ट ओरिजिनेट होतील. या रविवारी दिवसा मेन आणि हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच याबद्दल सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही कामे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.