
मुंबईतील उच्च सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये एक २२ वर्षीय तरुण तब्बल १४ दिवस विद्यार्थी बनून बेकायदेशीरपणे राहत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिलाल अहमद फैयाज अहमद तेली (२२ रा. मंगळूरु, कर्नाटक) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला १७ जून रोजी कॅम्पस सुरक्षा पथकाने पकडून पवई पोलिसांच्या ताब्यात दिले. तो आयआयटीच्या कॅम्पसमध्ये तो कसा घुसला आणि इतके दिवस कुठे राहत होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
आयआयटी बॉम्बेच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संस्थेचे कर्मचारी राहुल दत्ताराम पाटील (४८) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती CREST विभागाच्या अधिकारी शिल्पा कोटिक्कल यांनी ४ जून रोजी दिली होती. शिल्पा कोटिक्कल यांनी एका संशयित तरुणाला त्यांच्या कार्यालयात शिरताना पाहिले होते. त्यावेळी त्यांनी पण चौकशीसाठी ओळखपत्र मागितल्यावर तो पळून गेला.
त्यानंतर कोटिक्कल यांनी सीसीटीव्ही फुटेजमधून संशयिताचा चेहरा काढून तो आयआयटीच्या सुरक्षा पथकासोबत शेअर केला. सुरुवातीच्या शोधानंतरही तो सापडला नाही. तो कॅम्पसमध्ये लपून राहिला. अखेर १७ जून रोजी संध्याकाळी ४ वाजता कोटिक्कल यांनी त्याला पुन्हा लेक्चर हॉल LH 101 मध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेले पाहिले. त्यानंतर सुरक्षा रक्षक किशोर कुंभार आणि श्याम घोडविंदे यांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांना संशय आहे की, हा तरुण एखाद्या गंभीर कटाचा भाग असू शकतो. त्यामुळे पोलीस या घटनेकडे एका संभाव्य धोक्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. तो एखाद्या पाळत ठेवणे किंवा अन्य समन्वित हालचालींशी संबंधित आहे का, याचा तपास केला जात आहे. तो एखाद्या मोठ्या नेटवर्कचा भाग असू शकतो किंवा कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत असावा, अशी शक्यताही पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या चौकशीदरम्यान बिलाल तेलीने २ जून ते ७ जून आणि १० जून ते १७ जून या कालावधीत अनेक वसतिगृहांमध्ये राहिल्याची कबुली दिली.
आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये सुमारे १३,००० विद्यार्थी (यूजी, पीजी आणि पीएचडी) राहतात. कोणताही बाहेरील व्यक्ती दोन आठवडे कॅम्पसमध्ये खुलेआम फिरणे, लेक्चर हॉल आणि वसतिगृहांमध्ये प्रवेश करणे ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी, उद्देश आणि कोणाशी संपर्क होता याची सखोल चौकशी केली जात आहे.
आरोपीला पवईच्या आयआयटी कॅम्पसमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३२९(३) आणि ३२९(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, कोणत्याही मोठ्या धोक्याची किंवा नेटवर्कची शक्यता तपासण्यासाठी गुप्तचर यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे. प्रशासन सध्या बिलालच्या या बेकायदेशीर प्रवेशामागे काय उद्देश होता, तो कोणाच्या संपर्कात होता आणि त्याची नेमकी काय योजना होती, याचा शोध घेत आहेत.