Mumbra Train Accident: मुंब्रा लोकल अपघातानंतर फास्ट ट्रॅक वळणावर लोकलचा वेग मंदावला

मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मंगळवारी मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर रेल्वेचा वेग कमी केला आहे. खबरदारी म्हणून वळणवार वेग कमी केला गेला. अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbra Train Accident: मुंब्रा लोकल अपघातानंतर फास्ट ट्रॅक वळणावर लोकलचा वेग मंदावला
| Updated on: Jun 10, 2025 | 9:58 AM

मुंबईतील मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर रेल्वेचा वेग कमी केला आहे. कल्याण ते सीएसटीच्या दिशेने धावणाऱ्या मध्य रेल्वे सोमवारी ज्या वेगवान धावत होत्या, तो वेग आता नाही. या वळण रस्त्यावर लोकलचा वेग कमी करण्यात आला आहे. आता पूर्वीच्या वेगाने धावताना मध्य रेल्वे दिसत नाही. तसेच अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने सोमवारी सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय जाहीर केला होता.

अपघाताबद्दल मोठा दावा

लोकलमध्ये असलेल्या प्रचंड गर्दीमुळे अनेक जण रेल्वेच्या दरवाज्यामध्ये उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे सोमवारी तेरा व्यक्ती लोकलमधून पडून जखमी झाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे रेल्वेने आता खबरदारी म्हणून या वळण रस्त्यावर वेग कमी केल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी झालेल्या अपघाताबद्दल मोठा दावा करण्यात आला आहे. लोकलमधील प्रवाशांनी तीन ते चार वेळा चेन खेचले होती. त्यानंतरही ट्रेन थांबली नाही. मोटरमनने थेट ठाण्याला लोकल थांबवली, असे अपघातात मृत्यू झालेल्या केतन सरोज याचा मित्र आणि घटनेचा प्रत्यक्षदर्शी दीपक शिरसाठ यांनी सांगितले. लोकल थांबली असती तर काहींचे प्राण वाचले असते, असे शिरसाठ यांनी म्हटले.

दुर्घटनेत मृत पावलेला केतन सरोज (२३) आणि दीपक हे दोघेही उल्हासनगरातील रहिवासी आहेत. दोघेही ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कमध्ये कामाला जात होते. सकाळी साडेआठ वाजता शहाड येथून कसारा सीएसएमटी फास्ट लोकल पकडली. डोंबिवलीत आणि दिव्यात गर्दी झाली. मुंब्रा काही अंतरावर अरुंद वळणावर दोन्ही रेल्वे रुळावर अंतर कमी झाले. लोकलमधील एका प्रवाशाची बॅग दुसऱ्या डब्यातील प्रवाशांना लागली. त्यामुळे प्रवासी पडले.

मंगळवारी लोकल उशिराने

कल्याण ते सीएसटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील मध्य रेल्वे सेवा मंगळवारी 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे मुंब्रास रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. वातानुकूलीत लोकलमध्ये देखील रेल्वे प्रवाशांना आज शिरता येत नाही, इतकी गर्दी झाली आहे. अनेक दरवाजे बंद देखील होत नाही.

राहुल बहिणीच्या लग्नासाठी जमवत होता पैसे

मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून राहुल गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा राहुल बहिणीच्या लग्नासाठी पै-पै जमवत होता. घरातील मुख्य कमावता सदस्य तो होता. या घटनेनंतर दिवा स्थानकातून थेट लोकल सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.