आम्ही राडेबाज नाहीत, पण खबरदार भाजपच्या कार्यालयावर हल्ला केलात तर, फडणवीसांचा इशारा

पोलिसांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली जातेय. आम्ही हे सहन करणार नाही, क्रियेला प्रतिक्रिया येणारच आहे, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

आम्ही राडेबाज नाहीत, पण खबरदार भाजपच्या कार्यालयावर हल्ला केलात तर, फडणवीसांचा इशारा
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परीषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, मात्र त्यांच्या पाठिशी राहणार असल्याचं सांगितलं. पोलिसांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली जातेय. आम्ही हे सहन करणार नाही, क्रियेला प्रतिक्रिया येणारच आहे, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आपल्या कार्यालयावर पोलीस संरक्षणात चालून येत असेल तर भाजप कार्यालयाचं संरक्षण करावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे तालिबान नाही

शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय.

नारायण राणे यांच्या पाठिशी राहणार

एखाद्याच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. हे सांगत असताना यामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचं बिलकुल समर्थन करु शकत नाही. एखाद्याने वासरु मारलं म्हणून आम्ही गाय मारु, असं सरकार वागत असेल तर एक गोष्ट सांगतो, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नसेल, पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठिशी उभा राहील आणि राहतोय.

पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?

खरं म्हणजे ज्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केलीय, मला आश्चर्य वाटतंय, शर्जिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो, हिंदुंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता, आणि आज मात्र आख्खं पोलीस फोर्स नारायण राणेंवर कारवाईसाठी एक पोलीस पथक नाशिकहून, एक पुण्याहून निघालं आहे. कायद्याप्रमाणे हा कॉग्निजेबल ऑफेसन्स नाही, मी आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटतं, ते स्वत:ला छत्रपती समजतात का? की जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा. कोणत्या कायद्याने हा अधिकार दिला. मुळात हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, तुम्हाला आधी त्यांची बाजू ऐकावी लागेल, त्यानंतर कारवाई करावी लागेल.

सरकारला खूश करण्यासाठी कारवाई

ज्याप्रमाणे पोलिसांचा गैरवापर सुरु आहे, महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, पाच वर्ष मी काम केलं आहे. संपूर्ण देशात नि:पक्ष पोलीस म्हणून त्यांची ख्याती आहे. पण आता ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होत आहे, सरकार बस म्हटल्यावर हे लोटांगण घालत आहेत. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस कारवाई करायला लागले तर महाराष्ट्राची प्रतिमा तशी राहणार नाही. आधीच या सरकारच्या काळात जी वसुली कांडं झाली आहेत, त्यामुळे प्रामाणिक पोलिसांबाबत नजर बदलली आहे.

अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने सरकार पोलिसांचा वापर करत आहे, मला वाटतं पोलिसगिरी करत आहेत. प्रत्येकवेळी कोर्टाकडून चपराक बसत आहे. अर्णवपासून कंगनापर्यंत सर्व ठिकाणी चपराक बसल्या. हे जे चालू आहे ते योग्य नाही. मी सल्ला देतो, कायद्याने काम करा, बेकायदेशीरपणे काम करणारे पोलीस सध्या कुठे आहेत ते मी सांगण्याची गरज नाही. एकाच ऑफेन्सला तीन तीन गुन्हे दाखल होतात, ही ताकद शर्जिल उस्मानीबाबत दाखवा, असं आव्हान फडणवीसांनी दिलं.

जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहणार

पुन्हा सांगतोय राणे साहेबांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण सरकार पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर करत आहे ते पाहता भाजप राणेसाहेबांच्या पूर्ण पाठिशी आहेत. अवैधपणे राणे साहेबांना अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरु राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही, आणि आमच्यावर कारवाई.. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या:

वासरु मारलं तर सरकारची गाय मारण्याची भूमिका अयोग्य, राणेंवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया

राणेंना अटक केली तर जनआशीर्वाद यात्रेचं काय होणार? फडणवीसांकडून प्लॅन जाहीर

Maharashtra LOP Devendra Fadnavis warn Shivsena to not attack on BJP Office if they continue we answer them  over Narayan Rane statement on Uddhav Thackeray

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI