नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावा, पेपर फुटी प्रकरणी संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) तीन वर्षांपासून एका आरोपीच्या घरी भाडेकरू होते. यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावून चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यात एमपीएससी पेपरफुटी प्रकरण गाजत असताना या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील आरोपी गौरव पाटीलच्या घरात मंत्री नरहरी झिरवाळांचे विशेष कार्य अधिकारी तीन वर्षांपासून भाडेकरून म्हणून वास्तव्याला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात ठाकरे गटाने उडी घेतल्याने झिरवळ यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. सरकारी त्रुटी शिवाय पेपर फुटी होऊ शकत नाही. सरकारचा सहभाग आणि पाठिंब्याशिवाय पेपर फुटू शकत नाहीत. लोकसेवा आयोग, नीटवरील नियुक्त्या पाहिल्या. पण आता आपआपली माणसं भरली जात आहे. त्याचा लाभ आपल्या सग्यासोयऱ्यांना आणि गोतावळ्यातील लोकांना दिला जात आहे. हे आजचं राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांचं स्वरुप झालं आहे. पेपरफुटी प्रकरणी आरोपींना पकडलं. अनेकांना समन्स बजावलं. चौकशी केली. आता नरहरी झिरवाळ यांना समन्स काढून बोलवा. मंत्री असले म्हणून काय झालं? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी गौरव पाटीलच्या घरात मंत्री नरहरी झिरवाळांचे विशेष कार्य अधिकारी तीन वर्षांपासून भाडेकरून म्हणून वास्तव्याला होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या अन्न आणि औषध विभागाचा पेपर फुटला, त्याच विभागाच्या मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी आरोपीच्या घरात भाडेकरू असल्याने आता संशय वाढला आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवाळांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरेंची मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाकडून चौकशीही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गणेश देवरे कृषी विभागाच्या माध्यमातून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांनी आरोपी गौरव पाटीलचं नंदुरबारमधील घर भाड्याने घेतलं होतं, तिथे ते तब्बल 3 वर्षांपासून राहत होते. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आरोपींच्या नातेवाईकांचा आणि परिचितांचा गोतावळा समोर येत आहे. त्यातच आता गणेश देवरे यांचाही आरोपी गौरव पाटील यांच्याशी जवळचा संबंध असल्यानं नवनव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
आरोपी ऋतुजा पाटील, अमृत पाटील, गौरव पाटील आणि मंत्री नरहरी झिरवाळांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे हे सर्व नंदुरबारमधील एकाच कॉलनीतील रहिवासी होते. ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी 5 लाखांना हा फुटलेला पेपर विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर ऋतुजाने हा पेपर गौरवला पाठवला होता. सध्या हे सगळे लोक अटकेत असले तरी देवरेंच्या चौकशीमुळे या प्रकरणाला नवं वळणं आलंय. दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असं झिरवाळांनी TV9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.