
मुंबईतील दादर परिसरात शनिवारी (५ ऑक्टोबर) रात्री उशिरा प्लाझा बस स्टॉपजवळ भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका महिलेसह एकूण चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सुमारे ११:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी एका भरधाव आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने बेस्ट बसला जोरदार धडक दिली. यामुळे बस अनियंत्रित होऊन बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर आदळली.
बेस्ट बस क्रमांक MH01DR4654 (रूट क्र. १६९) ही वरळी डेपोवरून प्रतिक्षानगर आगाराकडे परतत होती. ती प्लाझा बस थांब्याजवळ थांबण्यासाठी येत असताना, दादर टी.टी.कडून शिवाजी पार्कच्या दिशेने येणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचे नियंत्रण सुटले. या टेम्पोने थेट बसच्या पुढील उजव्या टायरला जोरदार धडक दिली.
ही धडकेचा इतकी जबरदस्त होती की बस डावीकडे झुकली. त्यानंतर बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना चिरडत पुढे गेली. या अपघातात बसचा पुढील टायर फुटला आणि काचही तुटली. बेस्ट बसला धडकल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टॅक्सी आणि एका टूरिस्ट कारलाही धडक दिली. या दोन्ही गाड्यांचे यात मोठे नुकसान झाले.
#BREAKING A road accident occurred near Plaza bus stop, Dadar, at 11:30 PM on October 5, involving a Mateshwari wet lease bus (No. 7652) of Pratiksha Nagar Depot. One person, Shahabuddin (37), died and four others were injured when a tempo traveller lost control and collided with… pic.twitter.com/w2KyiPtPsC
— IANS (@ians_india) October 6, 2025
या दुर्घटनेत शहाबुद्दीन (३७) नावाच्या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याव्यतिरिक्त चार जण जखमी झाले आहेत. राहुल अशोक पडाले (३०), रोहित अशोक पडाले (३३), अक्षय अशोक पडाले (२५) आणि विद्या राहुल मोते (२८) अशी या चौघांची नावे आहेत. या जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सध्या जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.