
असंख्य मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा आज मेगाखोळंबा होणार आहे.
मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे लोकल सेवा उशिराने धावणार आहेत. तसेच काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासूनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक आहे. या काळात सीएसएमटीपासून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तसेच नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
ठाण्यातून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील. नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक आहे. या काळात सीएसएमटी, मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी १५.२८ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.३७ ते दुपारी १५.४५ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई ते मानखुर्द आणि पनवेल ते नेरुळ/ठाणे दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत ट्रान्स-हार्बर लाईन/मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर आज दिवसा कोणताही ब्लॉक नाही. मात्र, बोरीवली आणि भाईंदर स्थानकांच्या दरम्यान शनिवार २१ आणि रविवार २२ जूनच्या मध्यरात्री नाईट ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे काही जलद लोकल धिम्या मार्गावरून चालवण्यात येतील. तर काही लोकल रद्द असतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना मेगाब्लॉकचा विचार करून करावे. तसेच वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.