उद्धव ठाकरे राजकारणातले टाइमपास… एकेकाळच्या कट्टर शिवसैनिकाची खोचक टीका

प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना 'राजकारणातले टाइमपास' संबोधत घणाघाती टीका केली आहे. दसरा मेळाव्यात केंद्र-राज्य सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना, दरेकरांनी ठाकरेंना 'टिकोजी राव' म्हटले. मोदी-फडणवीस यांच्यावर विनाकारण टीका करण्यापेक्षा विकासावर बोलावे, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे राजकारणातले टाइमपास... एकेकाळच्या कट्टर शिवसैनिकाची खोचक टीका
Uddhav Thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 1:19 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा त्यांचे एकेकाळचे सहकारी, कट्टर शिवसैनिक आणि आताचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे हे टिकोजी राव झाले आहेत. केवळ टीका करण्यापलिकडे त्यांना काही सूचत नाही. उद्धव ठाकरे हे राजकारणातील टाइमपास आहेत, असा घणाघाती हल्ला प्रवीण दरेकर यांनी चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे हे टिकोजी राव झाले आहेत. पंतप्रधान मोदी, अमित भाई, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काही उरलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून मोठे योगदान आहे. त्यावर त्यांनी बोलावे. अमित शाह यांनी देशहितासाठी घेतलेल्या निर्णयावर बोलावे. विकासाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करू शकत नाहीत. त्यामुळे नॉन इश्यू उकरून काढले जात आहेत. आयजीच्या जीवावर बायजी होण्याचा हा प्रकार आहे, असा हल्लाच प्रवीण दरेकर यांनी चढवला आहे.

Loading...

जे घर सांभाळू शकले नाहीत ते…

टायगर श्रॉफ प्रकरण असो की पूर्णेकर प्रकरण असो, या प्रकरणात कोणीही असेल तर त्याला माफ करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. हल्लेखोरांना पकडण्याचं काम सुरू आहे. पण इकडे तोंडाची वाफ दवडली जाते आहे. गुन्हेगार कोणीही असो, कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. उद्धव ठाकरे राजकारणातला टाइमपास आहेत. त्यांच्या कानाखालून आमदार निघून गेले. त्यांचा हिंदुत्वाचा विचार निघून गेला. जे घर सांभाळू शकले नाहीत. ते रेजिम काय बदलतील? असा खोचक सवाल दरेकर यांनी केला आहे.

देशमुख का गेले माहीत आहे का?

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना 500 कोटींच्या मुद्द्यावरून घेरलं आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुखांना समन्स बजावला जातो तर एकनाथ शिंदेंना ईडी समन्स का बजावत नाही? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याचाही दरेकर यांनी समाचार घेतला. अनिल देशमुख गृहमंत्री असताना कोणत्या कारणाने त्यांना जावं लागलं हे राऊतांना माहीत आहे. भ्रष्टाचारामुळे देशमुख यांना जावं लागलं. मात्र, जरांगेंनी जो आरोप केला तसं काही असेल असं वाटत नाही. राऊत हे केवळ निराधार बोलत आहेत, असंही ते म्हणाले.

राऊतांवर हक्कभंग येऊ शकतो

कॅबिनेटमध्ये बिश्नोई गँगचे मेंबर असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत काहीही बोलत आहेत. त्यांच्यावर हक्कभंग येऊ शकतो. हा राज्य सरकारचा अपमान आहे. वाटलं तर आम्ही या संदर्भात राऊतांच्या विरोधात हक्कभंग आणू शकतो, असा इशाराही त्यांनी दिलाय.

राजकीय महत्त्वकांक्षा असणं ठिक आहे

एकनाथ शिंदे यांना पुढच्यावेळी मुख्यमंत्री करणार असल्याचं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच्या दसरा मेळाव्यात म्हटलं. त्यावरही दरेकर यांनी भाष्य केलं. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं बोलणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण एकमेव व्यक्तीच मुख्यमंत्री व्हावा आणि इतरांचं वाटोळं व्हावं असं बोलणं चुकीचं आहे. राजकीय महत्त्वकांक्षा असणं ठिक आहे. पण वाटोळं होईल वगैरे बोलायला नको होतं, असं सांगतानाच मुख्यमंत्री बदलाचा विषय सध्या कुठेच नाही. मुख्यमंत्रीपदासाठी 145 जागा निवडून याव्या लागतात, असा चिमटाही त्यांनी काढला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us