5 जूनला मान्सूनचं कोकणात आगमन! रत्नागिरी, रायगडसह औरंबादेत मान्सूनपूर्व सरी, पेरणीची घाई टाळा

| Updated on: May 20, 2022 | 8:32 AM

Monsoon Rain Update in Maharashtra : मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे सुखावले आहेत. कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

5 जूनला मान्सूनचं कोकणात आगमन! रत्नागिरी, रायगडसह औरंबादेत मान्सूनपूर्व सरी, पेरणीची घाई टाळा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : कोकणात (Konkan Rain) पाच जून रोजी मान्सूनचं आगमन होणार आहे. हवामान विभागानं (IMD) याबाबतचं भाकित वर्तवलं आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंत होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत त्यांनी कोकणा मान्सूनच्या (Monsoon Rain) आगमनाचा मुहूर्त काय असेल, याचा अंदाज वर्तवलाय. पाच जून रोजी तळकोकणात पावसाचं आगमन झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात मान्सूनचा पाऊस राज्यात सर्वदूर पसरेल, असंही होसाळीकर यांनी म्हटलंय. यंदा 99 टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच वेळेआधीच मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पुरेसा पाऊस होण्याआधी पेरणीची घाई करु नका, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलंय. मुंबई गुरुवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी आढावा घेतला.

मान्सूनपूर्व पावसाच्या सुखावणाऱ्या सरी…

दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे सुखावले आहेत. कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगडसह बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. गुरुवारी दुपारनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागात मान्सूनने वर्दी दिली.

हे सुद्धा वाचा

यंदा राज्यातील बहुतांश भागाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला. त्यामुळे आता सर्वांना पावसाची आस लागली आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे 7 जूनला महाराष्ट्रात येणारा मान्सूनचा पाऊस यंदा 5 जूनला राज्यात दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात यंदा समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यताय.

कुठे कुठे पावसाची हजेरी?

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्यात. दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या दमदार सरी बरसल्याचं बघायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरु होती. अखेरच्या टप्प्यातील आंब्याचं मोठे नुकसान मान्सूनपूर्व सरींनी होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय.

तर इकडे औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. पैठण, सिल्लोड, फुलंब्री, कन्नड, या तालुक्यात अवकाळी पाऊस झालाय. सुमारे दोन तास औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसाने झोडपलं. या पावसामुळे औरंगाबादकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय. तसंच बारामतीसह परिसरात मान्सूनपूर्व पाऊस झालाय. उकाड्याने हैराण झालेल्या बारामतीकरांना या पावसाने दिलासा मिळालाय. शुक्रवारी मध्यरात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली. बारामतीत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे शहरात अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला होता.