तर तुरुंगात जायलाही तयार; संजय राऊत यांचं कोर्टाच्या नोटिशीवर थेट विधान

संजय राऊत यांनी कोर्टाच्या अवमानाबद्दल माफी मागितली, पण नोटीस दिल्यास खटला लढण्याची आणि प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांचे विधान इतरांच्या विधानांवर आधारित होते. शिवसेना पक्षचिन्हाचा मुद्दा आणि आमदारांच्या अपात्रतेवरील न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे.

तर तुरुंगात जायलाही तयार; संजय राऊत यांचं कोर्टाच्या नोटिशीवर थेट विधान
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 11:09 AM

सर्वोच्च न्यायालयाबाबत मी जी काही विधानं केली, ती माझी स्वत:ची नाहीयेत. आधीच ही इतरांनी विधाने केलेली आहेत. त्यावर शोही झाले आहेत. मी फक्त लक्षात आणून दिलं आहे. कोर्टाचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. पण तरीही अवमान झाला, असं कोर्टाला वाटत असेल तर मी माफी मागत आहे. तरीही मला नोटीस दिलीच तर मी खटलाही लढायला तयार आहे. प्रसंगी तुरुंगातही जायला तयार आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.

मी न्यायालयाचा अवमान केल्याची माझ्या विरोधात तक्रार आहे. मी जी विधाने केली तीच विधाने अनेकांनी आधीच केली आहेत. प्रशांत भूषण यांनीही ही विधाने केली आहे. भूषण यांच्या एक्स अकाऊंटवर त्यांची पोस्ट आहे. सुप्रीम कोर्टाचे 65 जज मंत्र्यांसोबत लंडनला गेले, असं प्रशांत भूषण यांचं ट्विट आहे. त्यावर त्यांनी टीका केली आहे. मी फक्त यावर आश्चर्य व्यक्त केलं. याच मुद्द्यावर काही लोकांनी कार्यक्रम केले. समाजमाध्यमांवर शो झाले. मी फक्त या गोष्टीची आठवण करून दिली. त्यामुळे त्यांनी मला नोटीस जारी केली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...

मी खटला लढेन

मला नोटीस जारी केली आहे. आमच्या वकिलाने त्या नोटीसचा स्वीकार केला आहे. कोर्टाचा अवमान झाला अशी कोर्टाची भावना झाली असेल तर माफी मागा, असं आमच्या ज्येष्ठ वकिलाने सांगितलं. त्यामुळे मी माफी मागितली. माफी मागितल्यानंतरही मला नोटीस दिली तर तो खटला मी लढेन. माझी सुप्रीम कोर्ट आणि संविधानावर श्रद्धा आहे. त्यामुळे मी माफी मागितली. पण आम्हाला न्याय हवा. हे माझं वाक्य आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

आम्हाला न्याय हवा

आम्ही ज्या न्यायासाठी झगडत आहोत, तो आम्हाला मिळाला पाहिजे. शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हाचा विषय आहे. साडेचार वर्ष निवडणूक आयोगाने आणि न्यायालयाने आमच्या अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलं. आमचा पक्ष चिन्ह चोरून थर्ड पार्टीला दिलं. त्या थर्ड पार्टीने निवडणुकीचा लाभ घेतला. ते अजूनही सत्तेवर आहेत. 40 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होऊ शकला नाही. यावर कोर्टाने निर्णय घेतला पाहिजे. मी माफी मागितली आहे. आता आम्हाला न्याय हवा आहे, असं ते म्हणाले.

तुरुंगात जायला तयार

देशात 13 कोटी लोकांना एसआयआरमधून वगळलं आहे. महाराष्ट्रातून 2 कोटी आणि मुंबईतून 65 लाख मतदारांना वगळलं आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ती लढाई मी लढत आहे. तरीही माझ्या विरोधात तक्रार करण्यता आली आहे. त्याबद्दल मी माफी मागितली आहे. त्या उपर मी तुरुंगात जायला तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us