सिद्धिविनायकचोरी प्रकरणातील आरोपी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते, सदा सरवणकरांचा गंभीर आरोप
Sada Sarvankar : सिद्धीविनायक मंदिराच्या दानातील चोरीप्रकरणी ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी भाष्य करत शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गेल्या काही काळापासून मंदिरांच्या दानपेटीतील दान चोरीचा मुद्दा चर्चेत आहे. राम मंदिरानंतर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतही चोरी झाल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून त्यात सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी होत असल्याचा आरोप केला आहे. यावर आता सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी भाष्य करत शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आरोपींना पकडले
सदा सरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षावर निशाणा साधला आहे. सरवणकर यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एक पत्र वाचून दाखवले, त्या पत्राचा विपर्यास केला जात आहे त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. आपण इथे श्रद्धेने येतो. त्यामुळे पत्राचा जो संदर्भ आहे की या मंदिरात अघटित घटना घडली ती खरी आहे. काही कर्मचाऱ्यांकडून चोरी करण्यात आली होती, ती पकडण्यात आली आहे. पोलिस अधिकारी नांगरे पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आणि चोरी पकडण्यात यश आले.
पुढे बोलताना सरवणकर यांनी म्हटले की, सिध्दीविनायक न्यासमध्ये काही तरी सुरू आहे आणि यात गडबड आहे असे वाटताच एक पत्र नांगरे पाटील यांना एक पत्र दिले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला लोक दिले होते, कुठे-कुठे हे सगळं सुरू आहे ते विचारलं होतं. आरोपींमधील पहिले नाव राजन पेंडुरकर, त्यांनतर घाडीगावकर अशी 9 नावे आहेत. CCTV च्या आधारे आम्ही सगळ्यांना शोधले आणि त्यांना अटक करण्यात आली.
आरोपी ठाकरे गटाशी संबंधित
सदा सरवणकर यांनी पुढे बोलताना म्हटले की, सगळे कर्मचारी चार पाच दिवस तुरुंगात होते. चोरी करणारे जे प्रमुख होते, त्यांना विशाखा राऊत यांनी कामाला ठेवले होते. यातील बहुतांशी लोक हे उबाठाच्या शाखेत जाणारे-येणारे आहेत. ते ठाकरे गटाशी संबंधित आहेत हे सर्वांना माहिती आहे. हे सर्वजण ठाकरे गटाच्या संपर्कात होते. दरम्यान, आता सरवणकर यांच्या या विधानानंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राहुल लोंढे यांनी सांगितले की, आमच्या तक्रारीवरूनच या सगळ्यांना पकडण्यात आले आहे. 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे, हे प्रकरण घडल्यानंतर अचानक दानात आवक वाढली. हे जे दान वाढलेले आहे त्याचे ऑडिट झाले पाहिजे. आम्ही दक्षपणे कारभार करत आहोत. दादरपासून ते इथपर्यंत रॅकेट सुरू होते, या सगळ्यांना पकडले आहे.