नाशिकनंतर ठाणे जिल्हा हादरला… खड्ड्यांमुळे दोन दिवसात दोन मृत्यू; नागरिक संतापले

अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे चालकाला अंदाज न असल्यामुळे दोन दिवसांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नाशिकनंतर ठाणे जिल्हा हादरला... खड्ड्यांमुळे दोन दिवसात दोन मृत्यू; नागरिक संतापले
pothole
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 03, 2026 | 1:35 PM

सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर काही ठिकाणची रस्त्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे चालकांना खड्डा किती मोठा आहे? याचा अंदाज घेता येत नाहीये. केवळ दोन दिवसांमध्ये या खड्ड्यांमुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

शहापूर या ठिकाणी खड्ड्यामध्ये पडून टी डी आर एफ जवान विकास लहू गोरे याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शहापूरवरून ठाण्याकडे दुचाकीवरुन कामावर जात असताना खड्ड्यात गाडी गेल्याने दोन्ही टायर फुटले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे भिवंडी ठाणे मार्गावरील राहनाळ येथे खड्यामुळे भीषण अपघात झाला.

राहनाळ गावाजवळील काँक्रीट रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात गेल्याने घसरली. अपघातात अक्षयलाल पाल हे रस्त्याच्या कडेला पडले, तर सुनिता पाल या रस्त्याच्या मधल्या बाजूला पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अक्षयलाल पाल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत. दरम्यान, भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अनेक काँक्रीट रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वारंवार अपघात घडत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा अशा दुर्घटना थांबणार नाहीत, तसेच दुर्घटनाग्रस्त झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रशासना कडे केली आहे.

पालघरच्या वाडा तालुक्यातील कंचाड-गोऱ्हे फाटा राज्य मार्ग क्रमांक ३४ ची देखील अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास जीवघेणा बनला आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणेही कठीण झाले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात वाढत असून, शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना या खराब रस्त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर या रस्त्याच्या सुधारणेसाठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याची मागणी जोर धरत आहे. कंचाड- गोऱ्हे फाटा रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे… मात्र मंजूर निधीतून दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता तयार होणार का? याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मनसेचे अविनाश जाधव यांनी खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. “दर वर्षी पाऊस पडल्यावर खड्डे पडताता. आम्ही सांगत असतो पावसाळा यायच्या आधी सांगतो खड्डे बुजवा. काल आणि आज एक मृत्य झाला सरकार कुठे आहे? ठाण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? भिवंडीरस्त्याची अवस्था किती गंभीर आहे. आमचा आरोप आहे ज्याला डेंटर दिले तो काम करतो की नाही? ठाण्यात एवढे प्रश्न आहे, मात्र पालमंत्री कुठे दिसत नाही. गडकरी म्हणाले होते, अमेरिकेसारखे रस्ते करणार, मात्र श्रीलंकेसारखे रस्ते करा. ह्यांना लोकांसाठी काही घेणं देण नाही. लोकांसाठी रस्ते करताय ते फक्त टोलसाठी करताय. कपली पाटील यांच्याघराजवळ ब्रिज आताच खाली खचला आहे. पुढचा माणूस मरत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार आहे” असे ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us