तुकाराम मुंढेचा दणका, IIT बॉम्बे कॅम्पसमधील 2 कँटीन तात्काळ बंद

Tukaram Mundhe : FDA ने IIT बॉम्बेतील दोन कँटीनना स्टॉप बिझनेस नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे ही कँटीन तात्काळ बंद करण्यात आली आहेत.

तुकाराम मुंढेचा दणका, IIT बॉम्बे कॅम्पसमधील 2 कँटीन तात्काळ बंद
FDA Cancel Licence of IIT Bombey 2 Canteen
Image Credit source: Google
| Updated on: Aug 07, 2026 | 9:20 PM

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेल किंवा मेसवर तात्काळ कारवाई केली जात आहे. अशातच आता FDA ने IIT बॉम्बेतील दोन कँटीनना स्टॉप बिझनेस नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे ही कँटीन तात्काळ बंद करण्यात आली आहेत. तर तिसऱ्या कॅन्टीनला सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दोन कॅन्टीन तात्काळ बंद

बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान FDA अधिकाऱ्यांना दोन कँटीन भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) परवान्याशिवाय चालवली जात असल्याचे आढळले. त्यामुळे या दोन्ही कॅन्टीनना व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली. तर वैध परवाना असलेल्या तिसऱ्या कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे काही उल्लंघन आढळल्याने त्याला सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे ही तपासणी करण्यात आली होती. मात्र ही तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती की इतर कोणीतरी, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, परवान्याशिवाय चालणाऱ्या कॅन्टीनपैकी एक कॅन्टीन विद्यार्थी संघटना किंवा स्वतः संस्थेकडून चालवले जात होते. त्यामध्ये कोणताही खासगी कंत्राटदार सहभागी नव्हता. तपासणीवेळी त्या कॅन्टीनमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी जेवण करत होते.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही विद्यार्थ्यांनी कॅन्टीन बंद झाल्यास जेवणाची व्यवस्था कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर FDA अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईत FSSAI परवानाधारक अनेक खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आहेत आणि विद्यार्थी तेथे जेवण करू शकतात.

दरम्यान, महाराष्ट्र FDA कडून सुरू असलेल्या अन्न आस्थापनांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशातील हॉटेल आणि आदरातिथ्य क्षेत्रातील तीन प्रमुख संघटनांनी संयुक्तपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार योग्य प्रक्रिया पाळूनच ही कारवाई करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us