Tushar Gandhi | महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना अटक, मुंबईत मोठ्या घडामोडी, काय-काय घडलं?

महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ लेखक तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी आज ताब्यात घेतलं होतं. पण तीन तासांनंतर त्यांना सोडून देण्यात आलं. पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर तुषार गांधी यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली.

Tushar Gandhi | महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना अटक, मुंबईत मोठ्या घडामोडी, काय-काय घडलं?
| Edited By: | Updated on: Aug 09, 2023 | 9:15 PM

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. खरंतर आज 9 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट क्रांती दिवस आहे. महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी 1942 मध्ये इंग्रजांना ‘चले जाव’ अशी घोषणा देवून संपूर्ण भारतात क्रांती आणली होती. याच दिवसाचं औचित्य साधत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता. पण त्यांनी आंदोलन करण्याआधीच आज पोलिसांकडून त्यांना त्यांच्या सांताक्रुझ येथील घराबाहेरुन अटक करण्यात आली.

पोलिसांनी तुषार गांधी यांना जवळपास तीन तास ताब्यात ठेवलं. त्यानंतर तुषार गांधी यांची सुटका करण्यात आली. या घटनाक्रमनंतर तुषार गांधी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आम्ही प्रेमाचा संदेश घेऊन समाजात जाणार होतो. कदाचित आमच्या प्रेमाचा संदेशाची दहशत या सरकारला वाटली असेल म्हणून मला घराच्या बाहेरच अटक करण्यात आली. पोलीस ठाण्यात तीन तास बसवून ठेवण्यात आलं”, अशी प्रतिक्रिया तुषार गांधी यांनी दिली.

‘कित्येक निर्दोष लोकं तुरुंगात पडून’

“आमचा ऑगस्ट क्रांती मैदानावर हक्क आहे. त्यांची कीव यायला पाहिजे. बिचाऱ्यांची काय परिस्थिती होत असेल, ज्यांनी कधी स्वातंत्र्याला मानलं नाही, कित्येक दिवस तिरंग्याला मानलं नाही. त्यांची कीव काय, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला हवी”, अशी टीका तुषार गांधी यांनी यावेळी केली. “भारतात आज कित्येक निर्दोष लोकं तुरुंगात पडून आहेत. कित्येकांचे जीव गेले. न्यायव्यवस्थेचा काही फरक पडू दिला जात नाहीय. दडपशाही सुरु आहे”, असा आरोप तुषार गांधी यांनी यावेळी केला.

‘सत्तेत सहभागी झालेले शाहू, फुले, आंबेडकर यांच्या वारसाचा मुखवटा घेऊन फिरत होते’

यावेळी तुषार गांधी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा विरासा पुढे नेणारे पक्ष आता सत्तेत सहभागी झाले आहेत. याबाबत गाांधी यांना प्रश्न विचारला असता, सत्तेत सहभागी झालेले शाहू, फुले, आंबेडकर यांच्या वारसाचा मुखवटा घेऊन चालत होते. सत्तेची भूक हाच त्यांचा चेहरा होता, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

‘नफरत हटाव, मोहब्बत बचाव’चा नारा देणार होतो’

“आम्ही गेल्या 40 वर्षांपासून 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आम्ही इथे अभिवादन करण्याकरता येत असतो. आम्ही अभिवादनासाठी येतो, आंदोलनासाठी येत नाही. आमच्या भावना आम्ही सांगतो. यंदा मी माझ्या काही निवडक सहकाऱ्यांसोबत रॅली काढत होतो. या रॅलीमध्ये आम्ही ‘नफरत हटाव, मोहब्बत बचाव’चा नारा देणार होतो. पण त्याअगोदरच मला माझ्या घराखालून अटक करण्यात आली आणि 3 तास पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवण्यात आलं. त्यानंतर सोडण्यात आलं”, असं तुषार गांधी यांनी सांगितलं.