भांडुप स्थानकात थरकाप उडवणारी घटना! एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे नाहक बळी
Mumbai Railway News: भांडुप रेल्वे स्थानकात एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सकाळी ओव्हरहेड वायर तर सायंकाळी सिग्नल बिघाड झाल्याचे दिसून आले आहे.

मुंबईतील मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड केबल्समधून तारा लटकलेल्या आढळल्याने मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मुलुंड आणि नाहूर दरम्यान प्रवासी रुळांवरून चालताना दिसले. यानंतर मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या तब्बल १ ते २ तास विलंबाने धावत आहेत. अशातच यावेळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. साहिल थिटे असं या तरुणाचं नाव आहे. भांडुप रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून रेल्वे रूळ ओलांडत असताना तरुणाला एसी लोकलची जोरदार धडक बसली आहे. मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलची तरुणाला धडक बसल्याचे समोर आले आहे.
एसी लोकलच्या धडकेनंतर तरुण जवळपास १५ ते २० मिनिटे फरफटत पुढे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे. मृत तरुणाच्या कुटुंबियांसोबत संपर्क करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे तरुणाचा नाहक बळी गेला आहे. यामुळे आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी ९:२३ वाजता, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यानच्या डाउन स्लो लाईनवरील ओव्हरहेड इक्विपमेंटची (OHE) वायर तुटली. कांजूरमार्ग स्टेशनवर तसेच विक्रोळी आणि भांडुप दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. यामुळे सेंट्रल लाईनवरील लोकल ट्रेन १५ ते ६० मिनिटे उशिरा धावल्या आणि अनेक प्रवाशांना रुळांवरून प्रवास करावा लागला. रेल्वे प्रशासनाने सकाळी १० वाजता वीजपुरवठा खंडित करून तारा हटवण्याचे काम सुरू केले होते. मात्र अद्याप वाहतूक कोलमडली आहे.