Vidarbha Rain : चंद्रपुरात झेडपी शाळेवर वीज कोसळून 3 विद्यार्थी जखमी, अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले पावसाचे पाणी

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग बंद व भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. सिरोंचा तालुक्यातील बामणी गावाजवळ वेंकटापूर नाला वाहत आसल्याने वाहतूक ठप्प झाली.

Vidarbha Rain : चंद्रपुरात झेडपी शाळेवर वीज कोसळून 3 विद्यार्थी जखमी, अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले पावसाचे पाणी
चंद्रपुरात झेडपी शाळेवर वीज कोसळून तीन विद्यार्थी जखमी
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 9:03 PM

नागपूर : विदर्भात सर्वत्र आजही पावसाचा जोर कायम आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बहूतांश भागात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. याच दरम्यान गोंडपिपरी (Gondpipri) तालुक्यातील राळापेठ येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली. मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. वीज कोसळली तेव्हा शाळेत शिक्षक, विद्यार्थी होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. इलेक्ट्रिक उपकरणे आणि फिटिंगमध्ये स्पार्किंग होत ठिणग्या उडाल्याने 3 विद्यार्थी जखमी झालेत. अमर माधव राऊत (वर्ग चौथा), राशी ताजने (वर्ग सातवा ), निशांत उराडे (वर्ग सातवा ) अशी जखमींची नावे आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. वीज कोसळल्याने शाळेतील विद्युत वीज उपकरणे-स्मार्ट टीव्ही (Smart TV) नादुरुस्त झाली आहेत.

अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले पावसाचे पाणी

अकोल्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसाचे थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. काल रात्री अकोला शहरात मुसळधार पाऊस झाला. पाऊस जोरदार असल्याने पावसाचे पाणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आले. निवासी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर पाण्याचा तलाव तयार झाला होता. अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील गोरेगाव येथील नाल्याला आला पूर आला. पातूर आणी वाडेगाव येथे झालेल्या पावसामुळे गोरेगावच्या नाल्याला पूर आला. पुलावर 2 ते 3 फूट पाणी आहे. त्यामुळं अकोला ते वाडेगाव मार्ग बंद झाला. दरवेळी पावसाळ्यात या पुलावर हीच परिस्थिती राहते.

गोंदियात रोवणीला सुरुवात

गोंदिया जिल्हात सध्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. सर्वच तालुक्यात धान पिकाच्या रोवणीला सुरवात करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडत असताना महिला पावसाच्या सरी पडत असताना रोवणीचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. यात पावसाचा बचावासाठी रेनकोट घालून, किंव्हा प्लास्टिक झिल्ली चा वापर करताना दिसून आले

गडचिरोलीतील सिरोंचा-आलापल्ली मार्ग बंद

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग बंद व भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. सिरोंचा तालुक्यातील बामणी गावाजवळ वेंकटापूर नाला वाहत आसल्याने वाहतूक ठप्प झाली. सिरोंचा- आलापल्ली महामार्ग बंद झाला. पुलावर एक फूट पाणी वाहत असून पाण्याच्या प्रभाव जास्त असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. याच मार्गावर मेडारम नाल्यावर एक ते दीड फूट पाणी वाहत असून हा मार्ग बंद आहे.