आपण दोघेही वार आहोत… आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे; वडेट्टीवार आणि मुनगंटीवार यांच्या मनात काय?

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यातील "आपण दोघेही वार आहोत... एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे" हा संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपुरात एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या या दिलखुलास गप्पांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दोन्ही नेत्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, यावर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आपण दोघेही वार आहोत... आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे; वडेट्टीवार आणि मुनगंटीवार यांच्या मनात काय?
Sudhir Mungantiwar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 11:25 AM

राज्याचं सर्वोच्च पद आपल्याला मिळावं ही प्रत्येकाची इच्छा असते. मग ते सत्तेतील लोक असोत की विरोधी पक्षातील. प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायची इच्छा असते. मधल्या काळात तर आपल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देण्याचे बॅनर्स लावण्याचीही चढाओढ लागलेली पाहायला मिळत होती. इतकंच नाही तर काही नेत्यांनी तर मुख्यमंत्रीपदाची मनातील इच्छाही बोलून दाखवली होती. सध्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातील ही सुप्त इच्छा व्हायरल होत आहे. आपण दोघेही वार (वडेट्टीवार आणि मुनगंटीवार) आहोत… आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे, असा या नेत्यांचा संवाद व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या मनात वेगळी काही खलबते सुरू तर नाहीत ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा मुक्त संवाद मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी भागात काल तेलगू भाषिकांचा बदकम्मा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजेरी लावून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बाहेर पडत असतानाच तितक्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आत आले. यावेळी दोघांची काही क्षणासाठी भेट झाली. यावेळी विजय वडेट्टीवारांनी हसत मुखाने हस्तांदोलन करत सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आपली “मन की बात” शेअर केली. आपण दोघेही वार आहोत… आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांच्या या शुभेच्छांना मुनगंटीवार यांनी देखील अतिशय दिलखुलासपणे हसत दाद दिली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Loading...

मुनगंटीवार नाराज?

दरम्यान, फडणवीस यांच्या नेतृत्वात जेव्हा राज्यात सरकार स्थापन झालं. तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांना महत्त्वाची जबाबदारी मिळेल अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. मुनगंटीवार यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे मुनगंटीवार नाराज झाले होते. त्यांनी वेळोवेळी ही नाराजी बोलूनही दाखवली होती. अनेकदा थेट सरकारला आरसा दाखवण्याचं कामही त्यांनी केलं होतं. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या मनात नेमकं चाललंय काय? अशा चर्चा रंगल्या होत्या. पण मुनगंटीवार यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचं अनेकदा स्पष्टही केलं होतं. मात्र, काल वडेट्टीवार यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड गर्दीत आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात थेट विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

हे सरकारचं अपयश

दरम्यान, टायगर श्रॉफ याच्यावर काल झालेल्या हल्ल्यावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने टायगरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विरोधी काँग्रेस पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. मुंबईसारख्या संवेदनशील शहरात अशा पद्धतीने लॉरेन्स बिश्नोई गँगचे साम्राज्य निर्माण होणे हे सरकारचे अपयश आहे. या साम्राज्यामागे सरकारच आहे काय? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us