एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, आता आमदारांनीच… बड्या नेत्याचं मोठं विधान; दसरा मेळाव्यापूर्वीच हुंकार?

आमदार किशोर दराडे यांनी दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे मोठे विधान केले आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री करणे आमदारांच्या हातात असून, त्यामुळे विकासाला गती मिळेल असे दराडे म्हणाले. त्यांच्या या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे, विशेषतः गोरेगाव येथील दसरा मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, आता आमदारांनीच... बड्या नेत्याचं मोठं विधान; दसरा मेळाव्यापूर्वीच हुंकार?
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 10:01 AM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आज गोरेगावमध्ये दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्यातून एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वीच शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. शिंदेंना मुख्यमंत्री करायचे की नाही हे आता आमदारांच्या हातातच आहे, असं सूचक विधान किशोर दराडे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ऐन दसरा मेळाव्यापूर्वीच दराडे यांनी हे विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार किशोर दराडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. राज्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांचीच इच्छा आहे. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे की नाही हे शेवटी आमदारांच्या हातात आहे. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास विकासाला 100 टक्के गती मिळेल. सध्या विकासाला गती आहेच, मात्र शिंदे मुख्यमंत्री झाल्यास विकासाला आणखी गती मिळेल, असं विधान किशोर दराडे यांनी केलं आहे. त्यामुळे चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

Loading...

कायदा सुव्यवस्था उत्तम

अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका केली जात आहे. त्यावरही दराडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र दिसत नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अत्यंत काळजीपूर्वक काम करत आहेत. एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती चुकीची असू शकते, मात्र गृहविभाग अशा प्रवृत्तींना नक्कीच रोखेल, असं किशोर दराडे म्हणाले.

त्यांचं निलंबन

यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीवरही भाष्य केलं. विधान परिषद निवडणूक वगळता इतरत्र कोणतीही गडबड नाही. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे. बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना पक्षाने निलंबित केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पगारांवर परिणाम नाही

लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांच्या पगारावर कोणताही परिणाम होत नाही. अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे शिक्षकांचे पगार उशिराने होत आहेत. शिपायांकडून लिपिकाची कामे करून घेतल्यामुळे कामांना गती मिळत नाही. शासनाच्या चुकीमुळे शिक्षकांचे पगार उशिरा होत असल्याचा दावा चुकीचा असल्याचे दराडे यांचे म्हणणे आहे. शिक्षकांच्या पगारासाठी तरतूद आहे. त्यांचा पगार कोणीही रोखू शकत नाही. शिक्षकांचे पगार वेळेवर होत होते आणि यापुढेही वेळेवर होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us