Nashik : नाशिकचे सुप्रसिद्ध कवी, नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक राम पाठक यांचे पुण्यात निधन

| Updated on: Apr 27, 2022 | 10:00 AM

नाशिकः नाशिकचे (Nashik) सुप्रसिद्ध कवी (Poet), वास्तुविशारद आणि नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक राम पाठक (Ram Pathak) यांचे पुण्यात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पाठक यांनी राज्य शासनाच्या कर रचना व मूल्य निर्धारण विभागात 36 वर्षे नोकरी केली. ते 2008 मध्ये उपसंचालक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. काही वर्षांपू्र्वीच त्यांच्या पत्नी आणि साहित्यिक जयश्री पाठक […]

Nashik : नाशिकचे सुप्रसिद्ध कवी, नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक राम पाठक यांचे पुण्यात निधन
कवी राम पाठक
Follow us on

नाशिकः नाशिकचे (Nashik) सुप्रसिद्ध कवी (Poet), वास्तुविशारद आणि नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक राम पाठक (Ram Pathak) यांचे पुण्यात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पाठक यांनी राज्य शासनाच्या कर रचना व मूल्य निर्धारण विभागात 36 वर्षे नोकरी केली. ते 2008 मध्ये उपसंचालक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. काही वर्षांपू्र्वीच त्यांच्या पत्नी आणि साहित्यिक जयश्री पाठक यांचे निधन झाले होते. त्यानंतर पाठक पुण्यात वास्तव्यास होते. त्यांच्या मागे एक मुलगी, एक मुलगा, नातू असा परिवार आहे. पाठक यांचे चार कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यात स्वर तृष्णेचा, तिमिरमौन, श्वासांची प्रतिबिंबे, ऋतू तुझे माझे यांचा समावेश आहे. त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम केले. तबला, हार्मोनियम, बासरी ही वाद्ये वाजवण्यातही ते पारंगत होते. चित्रकला, अभिनय, एकांकिका लेखन असेन अनेक कलाप्रकार त्यांनी हाताळले. विशेषतः गझलप्रेमी अॅड नंदकिशोर भुतडा यांचा रोज एक शेर आणि राम पाठक यांनी त्याचा केलेला अनुवाद ही जुगलबंदी विशेष लोकप्रिय ठरली.

अनेक पुरस्कारांनी गौरव

पाठक यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. अनुष्टुभचा पु. शि. रेगे काव्य पुरस्कार, काव्यशिल्पचा बालकवी निसर्ग काव्य पुस्तक पुरस्कार, सावानाचा कवी गोविंद व छंदोमयी काव्य पुरस्कार, पद्मगंधा प्रकाशनाचा पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते. अखिल भारतीय बहुभाषिक कविसंमेलनात मराठी कविता वाचनासाठी महाराष्ट्रातून त्यांची निवड झाली होती. अनेक संमेलने त्यांनी आपल्या कवितांनी गाजवली होती.

नाशिकला येणे राहून गेले…

पाठक यांनी विपुल लेखन केले. त्यांनी विविध वृत्तपत्रातून केलेले स्तंभलेखनही गाजले. पाठक यांना पुण्याहून नाशिकला यायचे होते. त्यांनी आपल्या मित्रमंडळीला लवकरच नाशिकला येणार आहे, असे कळवलेही होती. मात्र, त्यांच्या निधनाने त्यांची ही इच्छा आणि नाशिकभेट राहिली ती राहिलीच. त्याबदद्ल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल साहित्यिक, कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.