अँटेलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेबद्दल धक्कादायक दावा, NIA ने दहशतवादी संघटनेचं कनेक्शन आणलं समोर
अँटेलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेबद्दल धक्कादायक दावा केला आहे. NIA ने त्याचं दहशतवादी संघटनेचं कनेक्शन समोर आणलं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेरील ठेवलेल्या स्फोटक प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्याचा साडेपाच वर्षानंतर जामीन मंजूर झाला होता. अँटिलिया बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे हा आरोपी आहे. दीर्घकाळ तुरुंगात राहिल्याने त्याचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु त्याच्या जामिनााला आव्हान देण्यात आलं. त्यामुळे सचिन वाझेचा जेलमधून बाहेर निघण्याचा मार्ग अवघड झाला आहे. त्याच्या जामीन सुनावणी प्रकरणात एनआयएने कोर्टात धक्कादायक दावा केला आहे.
अँटेलिया स्फोटक प्रकरणात NIA कडून महत्वाचा युक्तिवाद करण्यात आला आहे. सचिन वाझे याने केलेल्या कृत्यामुळे आर्थिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता, असा दावा एनआयएने सचिन वाझे जामीन सुनावणी प्रकरणात हायकोर्टात केला आहे. सचिन वाझेने केलेलं कृत्य हे दहशतवादी कृत्य आहे. त्यात स्फोटकांचा वापर झाल्याचा दावा एनआयएने केला आहे. दहशतवादी कृत्य ठरवताना प्रत्यक्ष केलेल्या कृत्यावर भर असावा, आरोपीच्या केवळ वक्तव्यावर नाही, असं एनआयएने म्हटलं आहे.
स्फोट होण्याची वाट पाहिल्यानंतरच कृत्याला दहशतवादी कृत्य म्हणता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. सामान्य व्यक्ती गाडीत नेमकं काय आहे, हे तपासायला जाणार नाही. कृत्यामागचा हेतू आरोपीच्या कृतीतून पाहावा, असा महत्वाचा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आला आहे. सचिन वाझेनेच जिलेटीन कांड्या ठेवल्या होत्या,असेही त्यांनी म्हटलं. परंतु यात कोणतही दहशतवादी कृत्य नसल्याचा दावा वाझेच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणात टेलिग्रामवर धमकी देण्यात आली होती. धमकीच्या पत्रात केवळ धमकी नव्हती, तर गुजरातमधील परिस्थितीशी तुलना करणारा सांप्रदायिक संदर्भही होता. धमकीच्या पत्रात राजकीय पक्ष आणि दहशतवादी संघटनेचा उल्लेख असल्याने हे साधे धमकीचे पत्र नसून दहशतवादी कृत्याच्या दृष्टीने विचार व्हावा, असेही एनआयएने म्हटलं आहे.
पाच वर्षांनंतर आरोप निश्चित
अँटिलया स्फोटक प्रकरणात वाझेसह 10 आरोपींच्या विरोधात पाच वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मुंबईतील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला होता. त्यानंतर सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आला होता.
