मोठी बातमी! …तर एकनाथ शिंदेंचा जीव धोक्यात आला असता, रामदास कदमांच्या आरोपांवर नितेश राणेंचा सर्वात मोठा दावा
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या क्लिपवरून रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता नितेश राणे यांच्याकडून देखील मोठा दावा करण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली या कथित ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून पाचशे कोटी रुपये घेतले आणि ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत देण्यात आले, असा दावा करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपवरून आता वातावरण चांगलं तापलं आहे. या ऑडिओ क्लिपनंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजपला एकनाथ शिंदे यांची भीती वाटत आहे का? एकनाथ शिंदे यांना संपवण्याची सुपारी भाजपमधून कोणी घेतली? एकनाथ शिंदे हे विश्वास ठेवून भाजपसोबत आले. कशा पद्धतीने भाजपचा प्लान चालतो, पैसे पक्षाकडून द्यायचे नाही पैसे परस्पर द्यायचे, तुमच्या प्रवीण दरेकर यांचं देखील नाव आलं आहे. याचे उत्तर भाजपला सुद्धा द्यावे लागेल, असं कदम यांनी म्हटलं होतं. दरम्यान कदम यांच्या या आरोपांना आता भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राणे?
रामदास कदम यांच्या वक्तव्यावर मंत्री नितेश राणेंनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कदम हे स्वतःच्या मनाने बोलतायत की शिंदेंच्या मान्यतेने? असा सवालच राणे यांनी उपस्थित केला आहे. रामदास कदम यांच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंची मान्यता आहे का?
फडणवीसांनी साथ दिली नसती तर शिंदेंचा जीव धोक्यात आला असता, असा मोठा दावा यावेळी राणे यांनी केला आहे. दरम्यान अशा वक्तव्यांमुळे महायुतीत फूट पडून विरोधकांना आनंद होईल, रामदास कदम यांच्या वक्तव्यावर शिंदेंनी भूमिका स्पष्ट करावी, असंही यावेळी राणे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी देखील याच मुद्द्यावरून कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.