जळगाव महापालिकेत महापौर निवडणुकीनंतरच्या पहिल्याच महासभेत गोंधळ, भाजप-शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने, प्रचंड गदारोळ

जळगावात महापौर निवडणुकीनंतर पहिल्याच महासभेत भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये मोठा वाद झाला (Clash between BJP and Shiv Sena corporators in Jalgaon Municipal Corporation).

जळगाव महापालिकेत महापौर निवडणुकीनंतरच्या पहिल्याच महासभेत गोंधळ, भाजप-शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने, प्रचंड गदारोळ
महापौर निवडणुकीनंतर पहिल्याच महासभेत गोंधळ, भाजपचे नगरसेवक म्हणतात, बहुमत सिद्ध करा

जळगाव : जळगाव महापालिकेची आज (बुधवारी) ऑनलाईन महासभा पार पडत आहे. या महासभेत महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत निर्णय झाला. तसेच शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनी आणि महापालिका प्रशासनात लवाद नेमण्याच्या विषयावरून भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेने हे दोन्ही विषय बहुमताच्या जोरावर मंजुर केले (Clash between BJP and Shiv Sena corporators in Jalgaon Municipal Corporation).

भाजपचे काही सदस्य थेट सभागृहात दाखल

मात्र, महासभा ऑनलाईन असताना बहुमत कसे सिद्ध केले? असा जाब विचारत भाजपचे काही सदस्य थेट सभागृहात दाखल झाले. यावेळी दोन्ही पक्षातील सदस्य आक्रमक झाल्याने जोरदार गोंधळ उडाला. महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा पार पडत होती. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित आहेत.

गाळ्यांच्या विषयावरून फुटले वादाला तोंड

महासभेत गाळ्यांचा विषय बहुमताने मंजूर झाल्यानंतर भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदस्य कैलास सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, धीरज सोनवणे यांनी ऑनलाईन पद्धतीने विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळात हा विषय मंजूर झाला. त्यानंतर लवाद नेमण्याचा विषय नगरसचिव गोराणे यांनी वाचायला घेतला. हा विषय देखील बहुमताने मंजूर होत असल्याने भाजपचे सदस्य आक्रमक झाले.

भाजप-शिवसेनेच्या सदस्यांचा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

त्यानंतर भाजपचे सदस्य कैलास सोनवणे, भगत बालाणी, धीरज सोनवणे आदी थेट सभागृहात दाखल झाले. त्यांनी हे दोन्ही विषय बहुमतांवर मंजूर केल्याबाबत आक्षेप घेतला. शिवसेनेने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद झाला (Clash between BJP and Shiv Sena corporators in Jalgaon Municipal Corporation).

वाद कसा निवळला?

हा गोंधळ वाढत गेल्याने शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सदस्य प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे हे देखील सभागृहात दाखल झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी ही महासभा ऑनलाईन असल्याने सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा वाद मिटला. नंतर सभा पूर्ववत सुरू होऊन, पुढील विषयांवर चर्चा सुरू झाली.

संबंधित बातमी : एकाच घरात विरोधक-सत्ताधारी, पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता, दोघं शिवसैनिक, जळगावातील अनोखं राजकारण