धीरज देशमुखांचा ‘लातूर पॅटर्न’; लसीकरणावरील टीकेनंतर केंद्र सरकारला आकडेवारीसह चोख उत्तर

काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी केंद्र सरकारचा खास लातूर पॅटर्नमध्ये समाचार घेतला आहे. त्यांनी आकडेवारीसहित केंद्र सरकारला उत्तर दिलं आहे. (dhiraj deshmukh corona vaccination)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:37 PM, 22 Apr 2021
धीरज देशमुखांचा 'लातूर पॅटर्न'; लसीकरणावरील टीकेनंतर केंद्र सरकारला आकडेवारीसह चोख उत्तर
DHIRAJ DESHMUKH

मुंबई : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आरोग्य व्यस्था कोलमडल्यामुळे उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होतोय. कोरोनाला थोपवायचे असल्यास लसीकरण हा नामी उपाय असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच लसीकरणावरुन मागील काही दिवसांपासून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. केंद्राकडून भाजपशासित राज्यांमधील लसीकरण मोहिमेवर (Corona Vaccination drive) टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी केंद्र सरकारचा आपल्या खास ‘लातूर पॅटर्न’ शैलीत समाचार घेतला आहे. त्यांनी आकडेवारीसहित केंद्र सरकारला उत्तर दिलं आहे. (Congress MLA Dhiraj Deshmukh given answers and criticizes central government on Corona Vaccination drive allegation made by Harsh Vardhan)

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आकडेवारी देण्याचे टाळले, मोघम उल्लेख

धीरज देशमुख यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. त्यांनी “देशासमोर कुठलीही आपत्ती आल्यावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढा देण्याची काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. याच भावनेतून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या केंद्र सरकारला कोविडच्या संकटातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने 18 एप्रिल रोजी पत्र लिहून काही सूचना केल्या.

मात्र, सुचनांबद्दल आभार मानण्याची कृतज्ञता दाखवण्याऐवजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्या पत्राचे उत्तर देताना राजकीय शेरेबाजी केली. तसेच काँग्रेसशासित राज्यांच्या लसीकरण मोहिमेबद्दल टीका केली. ही टीका करताना त्यांनी कुठलीही आकडेवारी देण्याचे टाळले. तसेच काँग्रेसशासित राज्यांचा लसीकरणाचा वेग कमी पडत असल्याचा मोघम उल्लेख केला,” असे धीरज देशमुख आपल्या फेसबुक पोस्टद्वार म्हणाले.

धीरज देशमुखांचे आकडेवारीसहित उत्तर

पुढे त्यांनी हर्षवर्धन यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना देशातील विविध राज्यांची आकडेवारी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिली आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीचाच आधार घेतलाय. “केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रा राज्याला मिळालेल्या डोसेसपैकी जवळपास 92% डोसेस पात्र नागरिकांना देण्यात आले. तसेच राजस्थान सरकारने 93 % तर पंजाब सरकारने मिळालेल्या डोसेस पैकी 89% लसीचे डोसेस नागरिकांना दिलेय. छत्तीसगड आणि झारखंड ही देशातील Tribal states म्हणून ओळखली जातात. भौगोलिक कारणांमुळे तसेच आधीपासूनच आरोग्याच्या पायाभूत सुविधा कमी असतानाही या राज्यांनी मिळालेल्या डोसेसपैकी 86% आणि 77% डोसेस आपल्या नागरिकांना दिले आहेत. ही बाब केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवी होती,” असे धीरज देशमुख म्हणाले.

खोटी माहिती पसरवू नका

तसेच पुढे त्यांनी आरोग्यमंत्री हे खोटी माहिती पसरवीत असल्याचा आरोपसुद्धा केला. देशात जी 6 राज्ये लसीकरणामध्ये आघाडीवर आहेत.; त्यात एकही राज्य भाजप शासित नाही, असेसुद्धा धीरज देशमुख यांनी दावा केला. तसेच “ही वेळ राजकीय चिखलफेक करण्याची नाही. मात्र खोटी माहिती प्रसारित होऊन सर्वसामान्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून ही माहिती समोर आणावी लागली,” असेसुद्धा त्यांनी म्हटलंय.

हर्षवर्धन यांचे आरोप काय ?

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील कोरोना परिस्थितीवर बोलताना 7 एप्रिल रोजी महाराष्ट्रावर सडकून टीका केली होती. महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे केंद्राच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा आरोप हर्षवर्धन यांनी केला होता. तसेच महाराष्ट्र सरकार राजकारण करत असून केंद्र सरकारवर विनाधार आरोप करत असल्याचाही दावा हर्षवर्धन यांनी केला होता.

“कोरोनाच्या नियंत्रणात महाराष्ट्र सरकारकडून बेजबाबदारपणे काम करण्यात आलंय. हा प्रकार समजण्यापलिकडचा आहे. कोरोना लस पुरवठ्यावर सातत्याने लक्ष दिलं जातंय. राज्य सरकारांना याबाबत नियमितपणे माहिती देण्यात येत आहे. यानंतरही सरकारकडून नागरिकांमध्ये भीती पसरवणं मूर्खपणा आहे. कोरोना नियंत्रणासाठी इतर राज्यांनी देखील आपल्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करायला हवी. काही राज्यांमध्ये 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना लसीकरण सुरु करण्याची मागणी केली जात आहे. याचा अर्थ या राज्यांमध्ये सर्व आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि वरिष्ठ नागरिकांचं लसीकरण झालंय असा अर्थ काढायला हवा. मात्र, तसं झालेलं नाही,” असं हर्षवर्धन म्हणाले होते.

इतर बातम्या :

Maharashtra Strict Lockdown: ब्रेक द चेन; आजपासून कडक निर्बंध, नवे नियम काय?

Maharashtra Corona Update : चिंता कायम; राज्यात 24 तासांत 67 हजार 13 नवे रुग्ण, दिवसभरात 568 जणांचा मृत्यू

आम्ही ह्या पापी समाजाचे घटक आहोत, रुग्णांसाठी काहीच करु शकत नसल्याची लाज वाटते, खंडपीठाची टिप्पणी

(Congress MLA Dhiraj Deshmukh given answers and criticizes central government on Corona Vaccination drive allegation made by Harsh Vardhan)