मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप; आंदोलकांविरोधात या आमदारांचा अब्रुनुकसानीचा दावा

| Updated on: Mar 16, 2023 | 7:48 AM

अनुदान मिळेल, या आशेने गरजू युवक व महिलांकडून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. अनेकांनी खाजगी कर्ज उचलून उद्योग उभारण्यास सुरुवात देखील केली. मात्र, आमदारांनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदान मिळालेच नाही.

मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप; आंदोलकांविरोधात या आमदारांचा अब्रुनुकसानीचा दावा
Follow us on

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘मेक इन गडचिरोली‘ योजनेच्या नावाखाली फसवणूक केली. व्यवस्थापक श्रीनिवास दोंतुला यांच्यासोबत मिळून युवक व महिलांची कोट्यवधींनी फसवणूक केली. याप्रकरणी तक्रार देऊनही कारवाई होत नाही. फसवणूक झालेल्या लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आंदोलकांविरोधात आमदार होळींनी प्रत्येकी एक कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. चार वर्षांपूर्वी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या संकल्पनेतून ‘मेक इन गडचिरोली’ ही योजना गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात आली. या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना मत्स्योत्पादन, कुकुटपलान, राईस मील, जेसीबी घेण्यासाठी कर्ज, अगरबत्ती प्रकल्प सारखे उद्योग उभे करण्यासाठी एमआयडीसी परिसरात भूखंड आदी १०० टक्के अनुदानावर मिळवून देऊन असे आमिष दाखविण्यात आले, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

उद्योगाच्या नावाखाली घेण्यात आले पैसे

अनुदान मिळेल, या आशेने गरजू युवक व महिलांकडून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. अनेकांनी खाजगी कर्ज उचलून उद्योग उभारण्यास सुरुवात देखील केली. मात्र, आमदारांनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदान मिळालेच नाही. उलट या तरुणांच्या नावावर लाखांची उचल करण्यात आली. अगरबत्ती उद्योग प्रकल्पातील प्रत्येक महिलांच्या नावे २ लाखांचे कर्ज उचलण्यात आले. आज बँकेचे कर्मचारी कर्ज वसूल करायला या युवक व महिलांच्या मागे तगादा लावत आहेत. जेव्हा की उद्योग उभारणीसाठी योजनेच्या नावाखाली या सर्वांकडून पैसे घेण्यात आले. मात्र, त्यानंतर ना अनुदान मिळाले ना ती योजना प्रत्यक्षात अमलात आली.

हे सुद्धा वाचा

अद्याप कोणतीही कारवाई नाही

फसगत झाल्याचे लक्षात येताच महिलांनी त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत करण्याची योजनेचा व्यवस्थापक श्रीनिवास दोंतुला आणि आमदार डॉ. होळी यांच्याकडे मागणी केली. मात्र, पैसे देण्यास ते टाळाटाळ करीत आहे. आमदारांनी मोठी स्वप्न दाखवून अनेकांची फसगत केली. त्यामुळे आमचे संसार उघड्यावर पडले. फसवणूक करणाऱ्या आमदार डॉ. देवराव होळी व श्रीनिवास दोंतुला यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यासाठी लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आरोप राजकीय हेतूने प्रेरित

आमदार डॉ. होळी यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून ते निराधार असल्याचे म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळावी म्हणून आपण मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर ही योजना चालू करण्याचा प्रयत्न केला होता. यातून कोणाचीही फसवणूक केलेली नाही. त्यामुळे निरर्थक आरोप करणाऱ्या ३० जणांवर न्यायालयात प्रत्येकी एक कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.