
राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या गुरुवारी मतदान होत आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह या सर्व 29 महापालिकांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासनाने या निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं म्हणून जनजागृतीही करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेने तर पाल्यांच्या माध्यमातूनच पालकांना मतदानाला येण्याचं आवाहन केलंय. महापालिकेच्या या अभिनव उपक्रमाची सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरू आहे.
पनवेल महापालिकेने मुलांच्या माध्यमातून आईवडिलांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. प्रिय आई बाबा, मतदानाच्या दिवशी 15 जानेवारीला वेळ काढा आणि मतदान करा, असं आवाहन मुलांनी केलं आहे. एक दोन नव्हे तर शहरातील 1 लाख पालकांना पनवेल महापालिकेने पाल्यांमार्फत साद घातली आहे. या मुलांनी आईवडिलांना पत्र लिहूनच मतदान करण्याचं साकडं घातलं आहे. त्यामुळे ही मोहीम सध्या पनवेलमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
पालिकेचा उपक्रम काय?
1) “पाल्यांमार्फत पालकांना साद” – विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती
2) 75 शाळा | 1 लाख विद्यार्थी | 1 लाख पालकांपर्यंत संदेश
3) 3D पुतळे, पथनाट्य, लोककला, मॅरेथॉन, सायकल रॅलीसह विविध उपक्रम
4) 15 जानेवारी, सकाळी 7.30 ते सायं. 5.30 मतदानाचे आवाहन
शाळेतून पत्र
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. “पाल्यांमार्फत पालकांना साद” या उपक्रमातून तब्बल 1 लाख पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवण्यात येत आहे. 75 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्याची विनंती असलेली पत्रे देण्यात येत असून 15 जानेवारीला मतदान करण्याचे आश्वासन पालकांकडून घेतले जात आहे. या उपक्रमामुळे पनवेलमध्ये यंदा मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी व्यक्त केला आहे.
किती उमेदवार निवडून द्यायचे
पनवेल महापालिकेसाठी एकूण 78 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. प्रभाग पद्धतीने उमेदवार द्यायचे आहेत. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही दुसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले उमेदवार दिल्याने ही बहुरंगी निवडणूक होणार आहे. मागच्यावेळी पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता होती. कविता चौतमोल या महापौर होत्या. त्या पनवेलच्या पहिल्या महापौर, पहिल्या महिला महापौर आणि पहिल्या दलित महापौर ठरल्या होत्या.