माझ्या जीवाला काही झालं तर…; प्रदीप पूर्णेकरांचा ‘तो’ जुना व्हिडिओ व्हायरल, मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, तपासाला नवं वळण
Pradeep Purnekar Murder Case News: हत्येपूर्वीच प्रदीप पूर्णेकरांनी जीवाची भीती व्यक्त केली होती. त्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे आता मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. माजी महापौर ठाणे मनपा मिनाक्षी शिंदे यांना चौकशीला बोलवणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुर्णेकर हत्या प्रकरणी मिनाक्षी शिंदे यांची चौकशी होणार आहे, अशी ठाणे पोलीस सुत्रांनी माहिती दिली आहे. आज मिनाक्षी शिंदे यांचे पती राजा शिंदे यांची चौकशी करण्यात आली आहे. ७ तास त्यांची चौकशी सुरू होती. यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिनाक्षी शिंदे यांच्यामुळे जीवाला धोका आहे, असं जाहीररित्या अनकेदा प्रदीप पूर्णेकर बोलले होते. तसेच पुर्णेकरांच्या हत्येनंतर या हत्येमागे मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजा शिंदे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रदीप पूर्णेकरांच्या परिवाराने मिनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता पोलीस मिनाक्षी शिंदे यांची चौकशी करणार आहेत. यातच प्रदीप पूर्णेकरांचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यात त्यांनी त्यांच्या जीवाला काही झाल्यास शिंदे जबाबदार असतील असे बोलले होते. यानंतर आता खळबळ उडाली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांचा सोशल मिडियावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पूर्णेकर परिवाराने व्हिडिओ व्हायरल केला आहे. प्रदीप पूर्णेकरांची पुतणी खुशबू पुर्णेकर यांनी सोशल मिडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात प्रदीप पूर्णेकर यांनी जाहीररित्या आरोप केले असल्याचे दिसून येत आहे. माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला टीएमसी, पोलीस प्रशासन आणि मिनाक्षी शिंदे जबाबदार असतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
या व्हिडिओवरून पुन्हा एकदा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाल्यापासून पुर्णेकर परीवार वारंवार आरोप करत आहे. प्रदीप पुर्णेकर यांची हत्या राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनी या व्हिडिओची पुष्टी करत नाही आहे. हा ५ महिन्यापूर्वीचा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.
मनोरमा नगर येथील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत प्रदीप पूर्णेकर यांनी कंटेनर ठेवला होता. त्या कंटेनरची तक्रार मिनाक्षी शिंदे यांनी पालिकेला केली होती. यानंतर पालिका प्रशासन कारवाईला आले होते. तेव्हा प्रदीप पूर्णेकर यांनी प्रसार माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली होती.
