तीन पक्षाची आघाडी करावी लागली अन् त्याची चूक… सांगलीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

| Updated on: Apr 25, 2024 | 4:50 PM

राज्यात अलिकडे जे काही बंड घडलं त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. मोदी आणि अमित शाह यांचा या सर्व बंडांना राजाश्रय होता. हा सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार होता. पक्ष फोडाफोडीमध्ये साम दाम दंड भेद वापरले, असा हल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सांगलीमध्ये बोलत असताना त्यांनी ही टीका केली.

तीन पक्षाची आघाडी करावी लागली अन् त्याची चूक... सांगलीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान
prithviraj chavan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगलीची जागा ठाकरे गट लढवत असला तरी या जागेबाबतची चर्चा अजून काही थांबलेली नाही. आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं धक्कादायक विधान केलं आहे. सांगलीच्या बाबतीत राजकारण झाले. मित्र पक्ष शिवसेनेने सांगलीबाबत हट्ट सोडला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सांगलीचा प्रश्न सुटला नाही. पर्याय दिला गेला, तोही पर्याय मान्य झाला नाही. शेवटी शेवटी काही तरी चुकले आहे हे मित्र पक्षाला समजले आणि मग एक एक विधानपरिषद घ्या, आमच्या कोट्यातील घ्या अशा ऑफर येऊ लागल्या, असा दावा करतानाच मविआ म्हणून तीन पक्षाची आघाडी करावी लागली आणि त्याची चूक सांगलीच्या जागेबाबत भोगावी लागतेय, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पण काहीही झाले तरी आघाडीचा धर्म पाळायला हवा होता, असंही ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण सांगलीत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगलीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सांगलीबाबतचा निर्णय सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ होता. पण निर्णय सर्वोच्च पातळीवर घडला आहे. 2019 मध्ये वेगळा निर्णय झाला असता तर आघाडी करावी लागली नसती. काही झालं तरी महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे, अन्यथा पुढच्या पिढीचा शाप घ्यावा लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

नंतर बरेच राजकारण झालं

सांगलीतून लोकसभा उमेदवारीसाठी एकच नाव समोर आले होते. पण नंतर बरेच राजकारण झालं. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात तीन पक्षाशी आघाडी झाली. सांगलीच्या जागेबाबत राजकारण झाले. यात आपण जाणार नाही. सांगलीची जागा परंपरागत आहे. काही अपवाद झाले. मागच्या वेळी असेच राजकारण झाले. उमेदवारी मिळाली पण चिन्ह मिळाले नाही. सांगलीबाबत काँग्रेस पक्षात कोणाचा वाद नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवडून येईल त्याच जागा…

सांगलीचा तिढा सुटला नाही. त्यामागचे राजकारण खूप मोठे आहे. हळूहळू ते पुढे येईल. जो वाटा दोन पक्षाच्या आघाडीत मिळणार होता. तो तीन पक्षात मिळणार नव्हता. ज्या जागा निवडून येतील अशा जागा घ्या असे आम्ही म्हणत होतो. त्यात एक नंबर सांगलीची जागा होती, असंही ते म्हणाले.