पुणे विभागातील अनेक रेल्वे गाड्या रद्द, कोणत्या पर्यायी मार्गाने वळवल्या? वेळापत्रकातही महत्त्वाचा बदल
पुणे विभागातील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ट्रेन कोणत्या पर्यायी मार्गाने वळवल्या, जाणून घ्या.

पुणे विभागातील रेल्वेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी पुणे आणि हडपसर यार्डात काम सुरू आहे. या कामाचा परिणाम शनिवारी आणि रविवारच्या रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत अनेक लांब पल्ल्यांच्या गांड्याचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच मोठया संख्येने गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता पुण्याऐवजी खडकी, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, सातारा, जेजुरीपर्यंत धावणार असल्याची माहिती हाती आली आहे.
रेल्वेने हाती घेतलेल्या कामामुळे पुणे-नागपूर, पुणे-सोलापूर, नागपूर-पुणे, पुणे-बीड, अमरावती-पुणे यांसह पुणे-दौंड आणि पुणे-बारामती मार्गावरील डेमूच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या कामाचा रविवारी धावणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. रविवारच्या दिवशी पुणे–मुंबई एक्स्प्रेससह पुणे–सोलापूर, पुणे–कोल्हापूर, पुणे–शिर्डी, पुणे–नागपूर आणि पुणे–अमरावती या मार्गावर परिणाम होणार आहे. पुणे-लोणावळा उपनगरीय सेवांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. पुणे विभागातील लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. चेन्नई-एलटीटी, पुणे–हावडा, हावडा–पुणे, निजामुद्दीन–वास्को-द-गामा आणि चंदीगड–यशवंतपूर एक्स्प्रेस या गाड्या पर्यायी मार्गाने धावणार आहेत. त्यामुळे काही गाड्यांना पुणे, लोणावळा, दौंड, सांगली, सातारा इत्यादी स्थानकांवर थांबा मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे विभागातील कामामुळे काही गाड्यांचा प्रवास खडकी किंवा दौंड येथेच थांबवण्यात येणार आहे. इंदूर,दौंड, जोधपूर-हडपसर, जयपूर-पुणे एक्स्प्रेस खडकीपर्यंत धावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, राणी कमलापती-पुणे एक्स्प्रेस आणि बारामती-डेमूचा प्रवास दौंडपर्यंत मर्यादित करण्यात आलाय. तर हडपसर-जोधपूर एक्स्प्रेससह काही गाड्या खडकीहून सुरू करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, पुणे-दानापूर अमृत भारत एक्स्प्रेस 3 ऑक्टोबर रोजी 15.25 ऐवजी 16 वाजता सुटेल. तर पुणे-दानापूर विशेष गाडी 3 ऑक्टोबर रोजी 4 तास 5 मिनिटांनी सोडण्यात येईल. तर 4 ऑक्टोबर रोजी 7 तास 40 मिनिटे उशिराने सुटणार असल्याची माहिती हाती आली आहे. हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई झाशी ही विशेष गाडी देखील 4 ऑक्टोबर रोजी अडीच तास उशिराने सुटणार आहे. पुणे–जम्मू तवी झेलम आणि पुणे–हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसच्या ३ ऑक्टोबरच्या वेळेत बदल करण्याचा पूर्वीचा प्रस्ताव रेल्वेने रद्द केला आहे. आता या दोन्ही गाड्या निर्धारित वेळेत धावणार आहेत.