धनंजय पोवारवर प्रवीण तरडे भडकले; थेट म्हणाले “माझ्या तावडीत सापडू नकोस..”
धनंजय पोवार अर्थात डीपी दादा लवकरच प्रवीण तरडे यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धनंजयने सेटवरचा एक किस्सा सांगितला.

मराठी मनोरंजनविश्वात सध्या अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार अर्थात डीपी दादा चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’मधून लोकप्रिय झालेला धनंजय आता मोठ्या पडद्यावर अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘जय श्री राम’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने धनंजयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाच्या सेटवरील एक मजेशीर किस्सा सांगितला. एका सीनदरम्यान प्रवीण तरडे यांनी त्याला चक्क ओरडल्याचं धनंजयने सांगितलं.
प्रवीण तरडे धनंजय पोवारवर का संतापले?
या मुलाखतीत धनंजय पोवारने प्रवीण तरडे यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. तो म्हणाला की, प्रवीण तरडे यांनी त्याला संपूर्ण शूटिंगदरम्यान केवळ एकदाच ओरडले होते. विशेष म्हणजे, त्यामागे कोणतीही मोठी चूक किंवा गैरवर्तन नव्हतं, तर एका सीनदरम्यान घडलेला मजेशीर प्रसंग होता. धनंजयने सांगितलं की, एका सीनमध्ये प्रवीण तरडे यांचा अतिशय भावूक संवाद होता. तो संवाद ऐकताना सेटवरील सगळ्यांच्याच अंगावर अक्षरशः काटा आला होता. त्या सीनमध्ये प्रवीण तरडे स्वतःच आपला संवाद पुन्हा पुन्हा म्हणत होते. त्यावेळी शूटिंगमध्ये थोडा गॅप होता. याच दरम्यान धनंजयला अचानक हसू आलं आणि तो जोरात हसला.
‘माझ्या डायलॉगच्या वेळी तावडीत सापडू नकोस’
धनंजय जोरात हसल्याचं पाहून प्रवीण तरडे यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यानंतर त्यांनी धनंजयला, ‘माझ्या डायलॉगच्या वेळी माझ्या तावडीत सापडू नकोस’, असं सुनावलं. प्रवीण तरडे यांचा राग पाहून धनंजयही गप्प झाला. याबद्दल सांगताना तो म्हणाला की, सरांचा राग हा त्यांनी दाखवलेल्या प्रेमापेक्षाही तीव्र होता. त्यामुळे आपण लगेच हात जोडले आणि तिथून निघालो, असं त्याने हसत हसत सांगितलं. धनंजयने हा किस्सा सांगताना प्रवीण तरडे यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी त्याने प्रवीण तरडे यांच्यासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे या दोघांमधील नातं आणि सेटवरील अनुभव जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, ‘जय श्री राम’ हा प्रवीण तरडे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात धनंजय पोवारसोबत अभिनेता हार्दिक जोशीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादा ही भूमिका साकारून हार्दिकने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आता या चित्रपटाच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
