
खराडी ड्रग्सपार्टी प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. 5 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ससून रुग्णालयाच्या अहवालात सात पैकी दोन जणांनी अल्कोहोलचे सेवन केले असल्याचं अहवालात निष्पन्न. सर्व आरोपींचे रक्ताचे व लघवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. चार ते सहा दिवसात फॉरेन्सिक लॅबमधून आरोपींनी अमली पदार्थांचे सेवन केले होते का? याचा अहवाल मिळणार आहे. एकनाथ खडसेचे जावई प्रांजल खेवलकर यांनी अल्कोहोलचे सेवन केले असल्याचे ससूनच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत. दुसरा व्यक्ती श्रीपाद मोहन यादव याने देखील अल्कोहोलचे सेवन केले असल्याचे ससूनच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
रविवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी खराडी परिसरात एका हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर छापेमारीची कारवाई केली. या कारवाई दरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतलं होतं. ही पार्टी एका हॉटेलमधील फ्लॅटमध्ये ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू होती. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या टीपच्या आधारावर ही कारवाई केली. एकनाथ खडसे यांचे जावई सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
पोलिसांना घटनास्थळी काय सापडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रेव्ह पार्टीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का होता. छापेमारीदरम्यान पोलिसांनी गांजा, कोकेनसह इतर अंमली पदार्थ, दारू, हुक्का सेटअप, एक लॅपटॉप, तीन पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क आणि काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली.
कुठले रुम प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक होते?
खराडी येथील स्टे बर्ड हॉटेलमधील रूम नंबर 101 आणि 102 प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक करण्यात आले होते. या खोल्यांचे भाडे 2,800 रुपये आणि 10,357 रुपये इतके होते, आणि त्या 25 ते 28 जुलै या कालावधीसाठी राखीव होत्या. या घटनेने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र चर्चांना उधाण आले आहे.
वेळ हेच उत्तर असतं…
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. त्यात रोहिणी खडसे यांनी लिहिलय की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे… प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं… योग्य वेळी सत्य बाहेर येईल !..जय महाराष्ट्र!